
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. परंतु, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणामुळे मार्चपासून चालू शैक्षणिक वर्षाच्या परीक्षांना सुरवात होणार आहे.
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वर्षभरापासून शाळा बंद आहेत. टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येत आहेत. शिवाय कोरोनावरील लसीकरणाला देखील सुरवात झाली असून, साधारण एप्रिल- मेपर्यंत संपुर्ण लसीकरण होवू शकते. यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष अर्थात जून महिन्यापासूनच नियमित शाळा सुरू होणार असल्याची शक्यता राज्याचे पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
कोरोनावरील कोव्हिशिल्ड या लसीकरण मोहिमेसंदर्भात जिल्हा रूग्णालयात आले असताना पालकमंत्री पाटील यांच्याशी संवाद साधला. गुलाबराव पाटील म्हणाले, की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. परंतु, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणामुळे मार्चपासून चालू शैक्षणिक वर्षाच्या परीक्षांना सुरवात होणार आहे. यामुळे आताच्या स्थितीत शाळा पुर्णपणे सुरू करणे शक्य होणार नाही. शिवाय लसीकरणाची मोहिम देखील एप्रिल- मे पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता असून, पालकांच्या मनात देखील मुलांना शाळेत पाठविण्या संदर्भात भिती राहणार नाही. म्हणून जुन महिन्यापासूनच नियमित शाळा सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बिनधास्त लस घ्यावी
कोरोनाच्या लसीकरणाला सुरवात झाली असून, अनेकांच्या मनात या बाबत भिती आहे. या विषयावर बोलताना पाटील म्हणाले, की प्रत्येकाने लसीकरण करावे. मोठ्या अधिकाऱ्यांनी लस घेतली असल्याने मनात असलेली भिती दूर करावी. कारण यापुर्वी देखील देवीची लस किंवा टीटीची लस घेतल्याने थोडा ताप येत असतो. यामुळे कोरोनाची लस घेतल्यानंतर काहींना थोडा त्रास जाणवला असला, तरी घाबरून न जाता सगळ्यांनी लस घेण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.