बैल धुण्यास गेलेल्या शेतकऱ्याला जलसमाधी 

रईस शेख
Wednesday, 27 January 2021

तापी नदीकाठावरुन जात असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर घटनेची माहिती संपूर्ण गावभर पसरली व संपूर्ण ग्रामस्थ घटनास्थळी एकत्र आले.

जळगाव : तालुक्यातील पळसोद येथे तापी नदीत बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकरी सुपडू बळीराम चौधरी (वय ५४) यांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सुपडू चौधरी हे शेतकरी असून त्यांच्याकडे असलेल्या बैलांना धुण्यासाठी ते गावालगत असलेल्या तापी नदीवर गेले होते. काठावरच कपडे व पायातील बुट काढले; तसेच बैलांना धुण्यासाठी पाण्यात उतरले. बैल धूत असताना एक बैल सुपडू चौधरी यांना खोल पाण्यात घेऊन गेला. या ठिकाणावरून सुपडू चौधरी यांना परतता आले नाही व त्यांचा बुडून मृत्यू झाला. 

अन्‌ गाव जमा झाले नदीकाठी
पळसोद गावातील युवराज वाघ हे यावेळी तापी नदीकाठावरुन जात असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर घटनेची माहिती संपूर्ण गावभर पसरली व संपूर्ण ग्रामस्थ घटनास्थळी एकत्र आले. गावातील पोलीस पाटलांनी घटनेबाबत तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह हा जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुपडू चौधरी यांच्या पश्चात पत्नी मंजुबाई , मुलगा अनिल, दोन मुली, सून नातवंडे असा परिवार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news tapi river farmer death the bull wash river