esakal | संतापजनक..आवाज देवूनही ना डॉक्‍टर आले ना कर्मचारी; शेवटी रिक्षातच झाली प्रसुती

बोलून बातमी शोधा

health center}

प्राथमिक आरोग्‍य केंद्रात प्रसुतीसाठी आलेल्‍या महिलेच्या दाखल करून घेण्यासाठी ना डॉक्‍टर आले ना कोणता कर्मचारी. असह्य झालेल्‍या वेदनांचा त्रास होत असल्‍याने महिलेला आत जाणेही कठीण झाले. मदतीसाठी कोणी आले नसल्‍याने प्रवेशद्वाराजवळच रिक्षातच प्रसुती करण्याची वेळ महिलेवर आली.

संतापजनक..आवाज देवूनही ना डॉक्‍टर आले ना कर्मचारी; शेवटी रिक्षातच झाली प्रसुती
sakal_logo
By
बापू शिंदे

तरवाडे (जळगाव) : तरवाडे (ता. चाळीसगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारात दुसरी प्रसुती झाली. आरोग्य केंद्रातील एकही अधिकारी कर्मचारी नसतांना अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने महिला किंवा बाळाचा मृत्यू होऊ शकतो. याबाबत वरिष्ठ अधिकारींनी दखल घेण्याची मागणी होत आहे.
कंडारी (ता.अमळनेर) येथील सासर तर ढोमणे(ता.चाळीसगाव) येथील माहेरवाशीन असलेल्‍या पुजा संदीप पाटील यांना प्रसुतीचा त्रास होवू लागल्‍याने सकाळी साडेआठच्या सुमारास तरवाडे येथील आरोग्य केंद्रात आल्‍या. परंतु प्रवेशद्वाराजवळच असतांना त्‍यांना असह्य वेदना होवू लागल्‍याने तिच्यासोबतच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना आरडाओरड करत डॉक्टर वाचवा असा आवाज देऊन बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी आरोग्य केंद्रात डॉक्टर किंवा इतर एकही कर्मचारी हजर नव्हता. परंतु संतती नियमनाच्या शस्रक्रियेसाठी सुमारे नऊ महिला दाखल होत्या. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईक महिलांनी पुजाची प्रसुती आरोग्य केंद्राच्या आवारात रिक्षातच केली. सुदैवाने पुजा व तिला झालेल्या पुत्र दोन्हीही सुखरुप आहेत.

चार महिन्यात दुसरा प्रकार
यापुर्वी म्‍हणजे साधारण चार महिन्यांपुर्वीही याच आरोग्य केंद्राच्या आवारात वडाळे येथील महिलेची प्रसुती ओमनी गाडीत झाली. यावेळी एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. हि दुसरी घटना घडली. या आरोग्य केंद्रात रुग्ण आल्यावर व यांना फोनवर कळवल्यावरच कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी येतात. कधी- कधी फक्त शिपायांच्या भरोशावर; तर बऱ्याच वेळा संतती नियमनाचे शस्रक्रियासाठी दाखल झालेल्या महिलाच सांभाळतात. याबाबतीत तालुका वैद्यकिय अधिकारी यांना अनेकवेळा तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही.

रूग्‍णालयात पाण्याची समस्‍या
पाण्याविनाच आरोग्य केंद्र आहे. यापुर्वीच्या वैद्यकिय आधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने कुपनलिका केली. मात्र तिलाही पाणी नसल्याने आता काही दिवसापुर्वी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. अजय राजपूत यांनी स्वतः खासगी शेतकऱ्यांच्या विहीरीवरुन पंप बसवून पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था केलेली आहे. मात्र कर्मचारी त्याचा वापर न करता जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने भिषण पाणीटंचाई होत आहे. आज देखील सकाळी चार वाजेपासून आरोग्य केंद्रात दाखल महिला नऊ त्यांच्यासोबत प्रत्येकी नऊ नातेवाईक व लहान बाळ यांना पिण्यास व स्वच्छतागृहात पाणी नाही.


आरोग्य केंद्राची एवढी ढिसाळ कर्मचारी यंत्रणा तातडीने सुधारुण रुग्णांना कोणत्याही बाबातीत कमतरता भासणार नाही. त्याबाबत दखल घेऊन कामचुकारांवर कारवाई करतो व लवकरच या आरोग्य केंद्रास भेट देतो. 
– डॉ. भिमशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी 

संपादन ः राजेश सोनवणे