esakal | दुचाकी खरेदीचा वेग सुसाट; कोरोनानंतरचे मार्केट, ३० टक्क्यांनी वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

two wheeler

गेल्या दहा वर्षांत शहरात दुचाकी विक्रीची दुकाने चांगलीच वाढली आहेत. कोरोनाच्या काळात दुचाकी विक्रीचा व्यवहार ठप्प झाला होता. या काळात वाहने विक्रीसाठी परवानगी दिलेली नव्हती. तरीदेखील काही विक्रेत्यांनी दुचाकी विकल्या.

दुचाकी खरेदीचा वेग सुसाट; कोरोनानंतरचे मार्केट, ३० टक्क्यांनी वाढ 

sakal_logo
By
आनन शिंपी

चाळीसगाव (जळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउनच्या काळात दुचाकीची विक्री काहीशी ठप्प झाली होती. मात्र, दिवाळीनंतर ग्राहकांचा वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून, महिनाभरात दुचाकी खरेदीमध्ये ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 
गेल्या दहा वर्षांत शहरात दुचाकी विक्रीची दुकाने चांगलीच वाढली आहेत. कोरोनाच्या काळात दुचाकी विक्रीचा व्यवहार ठप्प झाला होता. या काळात वाहने विक्रीसाठी परवानगी दिलेली नव्हती. तरीदेखील काही विक्रेत्यांनी दुचाकी विकल्या. मात्र, पाहिजे तसा व्यवसाय न झाल्याने दुचाकी विक्रेत्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता. सध्या बाजारात ग्राहकांची मागणी लक्षात घेता, अनेक नवनवीन दुचाकी विक्रीला आल्या आहेत. 

विविध स्‍कीमचे आकर्षण
कोरोनाची परिस्थिती सध्या पूर्वपदावर येत असताना वाहन विक्रीचा व्यवसाय कमी-अधिक प्रमाणात होईल, असे विक्रेत्यांना वाटत होते. प्रत्यक्षात मात्र, दुचाकींच्या खरेदीला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्यांनी वेगवेगळ्या स्कीम आणल्या असून, दुचाकींचेही नवनवीन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. यात विशेषतः दुचाकींना मोबाईल कनेक्टिव्हिटी, चार्जर, आकर्षक रंग आदींचा समावेश आहे. काही कंपन्यांच्या दुचाकींसाठी अक्षरशः ग्राहकांना काही दिवस वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे बुकिंग केल्यानंतरच या दुचाकी ग्राहकांना दिल्या जातात. 

कमी व्याजदराची भुरळ
कोरोना पूर्णपणे गेलेला नसल्याने सार्वजनिक ठिकाणी किंवा एसटी, रेल्वेच्या प्रवासात संसर्ग होण्याची भीती लक्षात घेता, स्वतःची दुचाकी असणे बरेच जण आवश्‍यक मानत आहेत. यामुळेदेखील दुचाकीची विक्री वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच ज्यांची रोख रक्कम देऊन वाहन खरेदी करण्याची क्षमता नाही, अशांसाठी कमी व्याजदरात दुचाकी उपलब्ध करून देणाऱ्या विविध खासगी कंपन्यादेखील कर्ज देण्यासाठी सरसावत आहेत. त्यामुळे दुचाकींची विक्री तब्बल ३० टक्क्यांनी वाढल्याचे चित्र चाळीसगाव तालुक्यात दिसून येत आहे. 

दुचाकींच्या किमतीमध्ये काहीअंशी वाढ झाली आहे. तरीदेखील वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचादेखील हा परिणाम आहे. दुचाकी खरेदी केल्यानंतर योग्य ती सेवा आम्ही ग्राहकांना पुरवीत असतो. 
- तन्वीर शेख, व्यवस्थापक, हीरो मोटर्स, चाळीसगाव 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image