esakal | चारशे वर्षांनंतर योग..गुरू-शनीमधील ‘महायुती’चा आज नजारा
sakal

बोलून बातमी शोधा

Jupiter Saturn

टेलिस्कोपमधून गुरू त्याच्या चार चंद्रांसह आणि शनी त्याच्या कड्यांसह एकाच वेळी ही महायुती बघता येणार आहे. याआधी १६ जुलै १६२३ ला अशी महायुती झाली होती आणि यानंतर १५ मार्च २०८० ला हा अनुभव घेता येईल. 

चारशे वर्षांनंतर योग..गुरू-शनीमधील ‘महायुती’चा आज नजारा

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : सोमवारी (ता. २१) सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्‍चिम दिशेला गेल्या चारशे वर्षांत न दिसलेल्या गुरू आणि शनीच्या महायुतीचा (Great Conjunction) विलक्षण नजारा बघायला मिळणार आहे. 
या योगामुळे सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरू आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आपल्याला दिसणार आहेत. साध्या डोळ्यांनी तर ते दिसणार आहेच; पण टेलिस्कोपमधून गुरू त्याच्या चार चंद्रांसह आणि शनी त्याच्या कड्यांसह एकाच वेळी ही महायुती बघता येणार आहे. याआधी १६ जुलै १६२३ ला अशी महायुती झाली होती आणि यानंतर १५ मार्च २०८० ला हा अनुभव घेता येईल. 

असा येतो ‘युती’चा योग 
प्रत्येक ग्रह सूर्याभोवती वेगवेगळ्या अंतरावरून आणि वेगवेगळ्या वेगाने फिरत असल्याने त्यांना आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळा काळ लागतो. जसे गुरू ग्रह सूर्याभोवती ७६ कोटी किलोमीटरवरून १३ किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने फिरतो. त्यास एक फेरी पूर्ण करण्यासाठी १२ वर्षे लागतात. शनीला सूर्याभोवती एक अब्ज ४९ कोटी किलोमीटरवरून ९.६८ किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने फिरताना एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास २९ वर्षे लागतात. गुरूचा वेग शनीपेक्षा जास्त असल्याने साधारण २० वर्षांनी गुरू शनीला पार करून पुढे जातो, या पार करण्याच्या वेळी ते आपल्याला एकमेकांच्या जवळ आलेले दिसतात. त्या वेळी या महायुतीचे अद्‌भुत दृश्य बघायला मिळते. 
 
खगोलतज्ज्ञांचे आवाहन 
महायुतीचा हा अद्‌भुत नजारा १२ इंचाच्या परावर्तित दुर्बिणीतून सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत मु. जे. महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या छतावर, जळगाव खगोलप्रेमी ग्रुप आणि मु. जे. महाविद्यालयातील भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बघता येणार आहे, असे खगोल अभ्यासक अमोघ जोशी व प्रा. प्रज्ञा जंगले यांनी कळविले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image