
पोटात गर्भ राहिल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या पोटात दुखत होते. मात्र दुखण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु, अधिक त्रास जाणवू लागल्याने पहुन आणि जामनेर येथील रूग्णालयात नेले असता तेथे उपचार होवू शकले नाही.
जळगाव : पहूर येथील गर्भवती असलेल्या २४ वर्षीय महिलेच्या पोटात गर्भाशयाच्या नलिकेत गर्भ राहिला होता. मात्र गर्भ अचानक फुटल्याने महिलेची प्रकृती खालावली होती. यानंतर सदर महिलेला शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार झाल्याने तिचे प्राण वाचले.
पहुर (ता. जामनेर) येथील २४ वर्षीय महिला तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. सदर महिलेला दोन मुले आहेत. पोटात गर्भ राहिल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या पोटात दुखत होते. मात्र दुखण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु, अधिक त्रास जाणवू लागल्याने पहुन आणि जामनेर येथील रूग्णालयात नेले असता तेथे उपचार होवू शकले नाही. यामुळे तिला तात्काळ शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सोनोग्राफीत काहीही दिसेना
गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने तिची सोनोग्राफी करण्यात आली. मात्र सोनोग्राफीमध्ये काहीही दिसून येत नव्हते. मात्र शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केल्यानंतर स्त्रीरोग तज्ञ डॉ. संजय बनसोडे यांनी तपासणी केली असता महिलेच्या अंगात रक्त कमी असल्याचे दिसून आले. शिवाय पोटात देखील रक्त जमा झाल्याचे तपासणी आढळले.
करावी लागली कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया
तपासणीदरम्यान महिलेच्या गर्भनलिकेत गर्भ राहिल्यानंतर तो फुटल्याचे निदान झाले. यामुळे पोट दुखत असून, प्रकृती खालावत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कोणताही वेळ न घालविता तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यानुसार महिलेची शस्त्रक्रिया करून पोटात जमा झालेले रक्त बाहेर काढले. तसेच फुटलेल्या गर्भ आणि गर्भनलिका काढून कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे महिलेचे प्राण वाचले असून महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले.