
दगडी दरवाजा पुरातत्त्व विभागाच्या राज्य स्मारक संरक्षित अंतर्गत असल्याने त्याला दुरुस्त अथवा पाडता येत नव्हते, तसेच त्याच्या दुरुस्तीसाठी पावणेदोन कोटी रुपये लागणार होते.
अमळनेर : पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाने राज्य संरक्षित स्मारक दगडी दरवाजा येथील पालिकेस दहा वर्षे देखभाल, दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 40 वर्षांपासूनची वाहतूक समस्या सुटणार आहे.
नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी पुरातत्त्व विभागाकडे दरवाजा पालिकेकडे सोपविण्याची मागणी केली होती. आमदार अनिल पाटील यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता. दगडी दरवाजाचा बुरूज कोसळल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद केली होती. दगडी दरवाजा पुरातत्त्व विभागाच्या राज्य स्मारक संरक्षित अंतर्गत असल्याने त्याला दुरुस्त अथवा पाडता येत नव्हते, तसेच त्याच्या दुरुस्तीसाठी पावणेदोन कोटी रुपये लागणार होते. तसा प्रस्तावही तयार केला होता. मात्र, शासनाकडे निधी नसल्याने हे काम होत नव्हते. दिवसेंदिवस दरवाजाची स्थिती खराब होत चालली असून, तात्पुरत्या लावलेल्या गोण्याही कोसळू लागल्या आहेत. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी दगडी दरवाजा अमळनेर पालिकेने ताब्यात घेऊन त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार नगराध्यक्षा पाटील यांनी पालिकेत ठराव करून सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख व पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडे मागणी केली. आमदार अनिल पाटील यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला. अखेर पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाच्या वैभव राज्य संरक्षित स्मारक योजनेंतर्गत दगडी दरवाजा (वेस) दहा वर्षांसाठी संगोपनार्थ पालिकेला देण्यास शासनाने मान्यता दिली. राज्य शासनाचे अवर सचिव प्र. म. महाजन यांनी नुकतेच हे आदेश दिले.
नाशिक विभागाचे पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालिका आरती आळे यांच्या दालनात आमदार पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, कृष्णा बालपांडे, पालिका अभियंता संजय पाटील उपस्थित होते.
वाहतूक समस्या सुटणार
ऐतिहासिक दरवाजा पालिकेस देखभालीसाठी देण्याच्या निर्णयामुळे 40 वर्षांची वाहतुकीची समस्या सुटणार असून, दरवाजाची दुरुस्ती होऊन सुशोभीकरणात भर पडेल. तसेच पुरातन व ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारकाचे जतन करता येणार आहे. पंकज चौधरी यांनी दरवाजाला तडे पडून तो कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे पुरातत्त्व विभागाला सूचित केले होते.