..अन् बाराशे रुपयांत ‘आयजी’
सामान्य विद्यार्थ्याने सतत दोन वर्षे अभ्यास केला, तर त्याला यशोशिखरावर पोचता येते,
अमळनेर (जळगाव) : उच्चपदावर जाण्यासाठी पैशांची गरज नसते, त्यासाठी सखोल व परिपूर्ण वाचनाची आवश्यकता असते. मी फक्त बाराशे रुपयांत ‘आयजी’ झालो आहे. सामान्य विद्यार्थ्याने सतत दोन वर्षे अभ्यास केला, तर त्याला यशोशिखरावर पोचता येते, असे मत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी व्यक्त केले.
मंगरूळ (ता. अमळनेर) येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, ग. स. बँकेचे माजी अध्यक्ष झांबर पाटील, संस्थेचे अध्यक्ष युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील, सुहासिनी पाटील आदी उपस्थित होते. डॉ. दीघावकर जळगाव जिल्ह्यात पोलिस ठाण्याच्या तपासणीसाठी आले असता त्यांनी शुक्रवारी मंगरूळ येथील ग्रामविकास शिक्षण मंडळास भेट दिली. संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयास ‘डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर’ असे नाव देण्यात आले.
पारावर बसून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची चर्चा
डॉ. दिघावकर म्हणाले, की सध्याची युवा पिढी हातात मोबाईल घेऊन पारावर बसून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कसा चुकतो, यावर चर्चा करते. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक अपयशी ठरतात. ग्रामीण भागातील मुलींनीदेखील स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी मंगरूळ येथे मुलींचे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि संगणक प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती दिली. शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पाटील, काँग्रेसचे तालुका प्रभारी बी. के. सूर्यवंशी यांनी काही शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर होऊनही विमा मिळत नसल्याची तक्रार केली. माजी आमदार डॉ. पाटील यांनीदेखील एका युवकाची बुडित रक्कम मिळण्याविषयी तक्रार केली. किरण पवार यांनी मठगव्हाण येथील सरपंचवरील अन्यायाबाबत तक्रार केली.
संपादन ः राजेश सोनवणे