गिरणेतून रब्बीसाठी पहिले आवर्तन 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यंदा रब्बी हंगाम बहरणार आहे

भडगाव/मेहुणबारे (जळगाव) : यंदाच्या रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून शनिवारी (ता. ५) सकाळी आठला दोन हजार क्यूसेकचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. या आवर्तनामुळे रब्बी पिकांना मोठा फायदा होणार आहे. काही दिवसांपासून गिरणेतून आवर्तन सोडण्याची मागणी होत होती. 
यंदा पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. मुबलक पाण्यामुळे या साठ्यातून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने मिळणार आहेत, तर पिण्याच्या पाण्यासाठी दोन आवर्तने आरक्षित आहेत. जूनपर्यंत एकूण पाच आवर्तने सोडण्यात येणार आहेत. यापैकी धरणातून गिरणा नदीत पहिले आवर्तन शनिवारी (ता. ५) सकाळी आठला सुटले, तर ८ डिसेंबरला जामदा डावा कालवा आणि ११ डिसेंबरला उजव्या कालव्यास पहिले आवर्तन सोडण्यात येईल. 
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पारोळा, एंरडोल, धरणगाव, अमळनेर, पाचोरा तालुके आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव व धुळे तालुक्यांतील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रातील सिंचनासाठी या आवर्तनाचा फायदा होईल. आवर्तन सुटणार असल्याने कोणीही नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन गिरणा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता धमेंद्रकुमार बेहेरे, शाखा अभियंता एस. आर. पाटील, उपअभियंता हेमंत पाटील यांनी केले आहे. 

हंगाम बहरणार 
गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यंदा रब्बी हंगाम बहरणार आहे. गिरणा धरणात सध्या १८ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढा उपयुक्त साठा आहे. रब्बीसाठी एका आवर्तनाला साधारण दोन हजार ६०० दशलक्ष घनफूट एवढे पाणी लागते. त्यामुळे तीन आवर्तनांना साधारण साडेसात हजार दशलक्ष घनफूट पाणी लागण्याची शक्यता आहे. गिरणा धरणावर एकूण ६९ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यात जळगाव जिल्ह्यातील ५७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. पण, पाटचाऱ्यांची दुरवस्था पाहता साधाणत: २५ हजार हेक्टरपर्यंत पाणी पोचते. दरम्यान, यंदा पावसाळा चांगला झाल्याने विहिरीच्या पातळीतही चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अगोदरच विहिरीच्या पाण्यावर रब्बीची पेरणी केली आहे. गिरणा पाटबंधारे विभागाकडून कालवा व पाटचाऱ्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. 
 
गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना रब्बीसाठी पाणी हवे असेल, त्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाणी मागणीचा अर्ज करावा. 
-आर. डी. पाटील, उपअभियंता, गिरणा पाटबंधारे, भडगाव 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhadgaon first cycle for the rabbi from the mill