एसआरपीचे केंद्र वरणगावला की कडसगावला? 

rohit pawar
rohit pawar

भडगाव : जळगाव जिल्ह्यात मंजूर असलेले राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुडसगाव येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली राजकीय ताकद वापरत हे केंद्र पुन्हा जिल्ह्यातच ठेवण्यात यश आल्याचे सांगितले. मात्र मंगळवारी (ता. १४) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्य राखीव दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत कुडसगाव येथील संभाव्य जागेची पाहणी केल्याची फेसबुक पोस्ट केली. त्यामुळे राज्य राखीव दलाचे प्रशिक्षण केंद्र नेमके जळगावला की नगर, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 
जळगाव जिल्ह्यात वरणगाव येथे १९९४ पासून पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत मागणी आहे. त्यानंतर सातत्याने हा प्रश्न शासनदरबारी रेंगाळत राहिला. युती शासनाच्या काळात २०१९ मध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्राऐवजी राज्य राखीव पोलिस बल क्रमांक १९ स्थापन करण्यात तत्त्वत: मान्यता दिली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यांनी हे प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यातील कुडसगाव येथे स्थलांतरित करण्याचे आदेश काढले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींवरच प्रश्‍न उठले. ९ जुलैला हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जळगाव जिल्ह्यातील वरणगाव-हतनूर येथे स्थापन करण्याबाबत पोलिस उच्चस्तरीय समितीत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, मंगळवारी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी एसआरपीच्या अधिकाऱ्यांसमवेत नियोजित कुडसगाव येथील प्रशिक्षण केंद्राच्या जागेची पाहणी केली. त्या संदर्भात त्यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्टही केली. त्यामुळे नेमके एसआरपीचे प्रशिक्षण केंद्र कुठे होणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

केंद्र कुठे होणार? 
राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण केंद्रावरून नगर आणि जळगाव जिल्ह्यात सध्या रस्सीखेच सुरू आहे. या विषयावरून गेल्या आठवड्यात राजकीय घमासान सुरू होते. मात्र प्रशिक्षण केंद्र जळगाव जिल्ह्यातच होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वातावरण शांत झाले होते. पण मंगळवारी आमदार पवार यांनी अधिकाऱ्यांसमवेत जामखेडमधील कुडसगाव येथील नियोजित जागेची पाहणी केल्याने हा प्रश्न तापण्याची चिन्हे आहेत. पण हे केंद्र सद्यःस्थितीला कुठे होणार, या प्रश्नाचे उत्तर तूर्त तरी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार रोहित पवार यांनाच माहीत, असे म्हणण्याची वेळ जिल्हावासीयांवर आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com