भाईने हफ्ता मांगा है, भाई को हफ्ता देना पडेगा..हॉस्‍पिटल चलाना है तो 

चेतन चौधरी
Thursday, 22 October 2020

"कलीम भाईने हफ्ता मांगा है, कलीम भाई को हफ्ता देना पडेगा. यह हमारा एरिया है. डॉक्टर को दवाखाना चलाना है कि नही, हप्ता नही देने पर दवाखाना बंद कर देंगे." असा दम कार्मचाऱ्यांना भरला.

भुसावळ (जळगाव) : दर महिन्याला ५० हजार रुपये देण्यात यावे, अशी धमकी देऊन शिविगाळ करुन पैसे न दिल्यास पिस्टल व तलवारीचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद येथील डॉ. स्वप्नील कोळंबे यांनी बाजारपेठ पोलिसात दिली. त्यामुळे कलीम शेख सलीम याच्यासह चार जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शहरात खुनाच्या घटनासह गावठी कट्ट्यांचा उत आला असून, त्यात डॉक्टरला खंडणी मागितल्यामुळे खळबळ उडली आहे. दरम्यान, या गुन्ह्याची दखल घेऊन पोलिस अधिक्षक प्रवीण मुंढे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्याला भेट देऊन सबंधित अधिकाऱ्यांना तपासाबाबत सूचना दिल्या. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील जामनेर रोडवरील दिनदयाल नगर समोरील कोळंबे हॉस्पिटलचे डॉ. स्वप्नील राजाराम कोळंबे (वय ३८) यांना दीनदयाल नगरातील रहिवासी असलेल्या शे. कलीम शे. सलीम याने दर महिन्याला ५० हजार रुपयांची खंडणी मागितली आहे. 

दवाखाना चलाना है की नही..
दरम्यान १२ ऑक्टोबरला सायंकाळी तीघांनी हॉस्पिटलात दाखल होत. "कलीम भाईने हफ्ता मांगा है, कलीम भाई को हफ्ता देना पडेगा. यह हमारा एरिया है. डॉक्टर को दवाखाना चलाना है कि नही, हप्ता नही देने पर दवाखाना बंद कर देंगे." असा दम कार्मचाऱ्यांना भरला. यानंतर दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना रस्त्यावर गाठून ही धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर १३, १४, २० व २१ ऑक्टोबरला पिस्टल व तलवार बाळगत दवाखान्याच्या परिसरात येवून धमकवण्यात आले. दर महिन्याला ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याबाबत बाजारपेठ पोलिसात डॉ. स्वप्नील कोळंबे यांच्या फिर्यादीनुसार शेख कलीम शे.सलीम, संदीप (पूर्ण नाव माहित नाही) यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय मंगेश गोटला करित आहे. 

प्रशासनाकडून गंभीर दखल 
डॉक्टरला धमकी देणे ही बाबा गंभीर असून, प्रशासनाने गांभिर्याने घेतली आहे. आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक प्रवीण मुंढे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्याला भेट दिली असताना दिली. यावेळी डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे उपस्थित होते. दरम्यान आमदार संजय सावकारे यांनीही पोलिस अधीक्षकांची भेट घेवून याबाबत चर्चा केली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal asking for money by showing pistol