रेल्वेत महिलांची सुरक्षा करणार ‘मेरी सहेली’; मध्य रेल्वेचे अभियान ! 

चेतन चौधरी 
Wednesday, 28 October 2020

नावाप्रमाणेच ‘मेरी सहेली’ ही महिला प्रवाशांची सतत सोबती म्हणून काम करेल, जी त्यांची सुरक्षा केवळ सुरवातीच्या स्थानकांतच नव्हे तर मार्गावरील स्थानकांवर, रेल्वे गाडीत आणि शेवटच्या स्थानकावर देखील करेल.

भुसावळ : महिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेने ‘मेरी सहेली’ अभियान सुरू केले आहे. महिला प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षा पुरविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि मध्य रेल्वेने सुरू केलेले हे एक विशेष अभियान आहे. हा कार्यक्रम रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सुरू करण्यात आला आहे. 

रेल्वेत प्रवास करताना महिलांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच सह प्रवाशांकडून होणारा त्रास लक्षात घेता रेल्वे प्रशासनातर्फे ‘मेरी सहेली’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्यास महिला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत आहे. नावाप्रमाणेच ‘मेरी सहेली’ ही महिला प्रवाशांची सतत सोबती म्हणून काम करेल, जी त्यांची सुरक्षा केवळ सुरवातीच्या स्थानकांतच नव्हे तर मार्गावरील स्थानकांवर, रेल्वे गाडीत आणि शेवटच्या स्थानकावर देखील करेल. या अंतर्गत महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके महिला प्रवाशांसह सर्व डब्यांमध्ये जावून या महिला प्रवाशांशी संवाद साधतील. 

हेल्पलाइनद्वारे संपर्क 
महिला प्रवाशांशी संवाद साधताना हे पथक आरपीएफ सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक १८२, जीआरपी हेल्पलाइन क्रमांक १५१२ या द्वारे संपर्कात राहतील. तसेच सुरक्षेच्या इतर सूचना देतील. 

सुरक्षा, आरोग्याबद्दल विचारपूस 
रेल्वे प्रवाशांचे नाव, पीएनआर / तिकिट क्रमांक, कोच आणि बर्थ क्रमांक इत्यादी प्रवाशांचा तपशील देखील ‘मेरी सहेली’ पथक नोंदवेल. हे तपशील मूळ स्थानक ते शेवटच्या स्थानकापर्यंत मार्गावरील इतर क्षेत्रांत, विभागांमध्ये सामायिक केले जाईल. थांबलेल्या स्थानकांवर तैनात ‘मेरी सहेली’ पथक महिला प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याबद्दल विचारपूस करेल. अधिक चांगली सेवा देण्यासाठी पावले उचलण्यासाठी प्रवासाचा अनुभव अभिप्राय स्थानकांवर घेतला जाईल. 

या गाड्यांचा समावेश 
मध्य रेल्वेच्या २४ गाड्यांमध्ये ‘मेरी सहेली’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात मुंबई-नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस, गोदान एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई विशेष, मुंबई-हावडा एक्स्प्रेस, पुणे-पाटणा विशेष या गाड्यांचा समावेश आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal Central Railway's campaign to protect women in railways 'Meri Saheli'