भुसावळच्या बब्बूदादाचा दबदबा..पण कशात ? वाचून तुम्हीही होणार अचंबित

भुसावळच्या बब्बूदादाचा दबदबा..पण कशात ? वाचून तुम्हीही होणार अचंबित

भुसावळ ः  शाळा सोडून पैसे कमावयचे म्हणून वडीलांसोबत काम, चहाच्या टपरीवर कपबश्या धुणे, भेळवाल्याच्या गाडीवर भाडी घसणे असे पैसे कमाविण्यासाठी नाही ते उद्योग करून एका वेगळा वळणावर येवून ते एका व्यवसायात आपला वेगळी ओळख बब्बुदादाने तयार केली. 

जसा नवीन घरे बांधण्याचा व्यवसाय आहे, तसाच जुनी पडाऊ, जीर्ण झालेली घरे पाडण्याचाही एक स्वतंत्र व्यवसाय आहे, याची अनेकांना कल्पना नसेल. भुसावळ परिसरात दहा ते बारा लोक या व्यवसायात आहेत. मात्र, यात दादा माणूस आहे ते अस्लम खान होय. मात्र त्यांना सगळेजण बब्बूदादा या नावानेच ओळखतात. 

असे घडत गेले...

भजे गल्लीत राहणारे वडील गय्यास खान दिलावर खान बांधकाम क्षेत्रात मिस्त्री होते. त्यांना सात मुले होती. त्यात बब्बू पाचवे होते. अभ्यासात फारसे लक्ष नसल्याने सातवीतच शाळा सोडली. आपल्या व्यवसायातील एन्ट्रीबाबत बब्बूदादा सांगतात...मित्रांबरोबर रेल्वेत खारे दाणे, फुटाणे, चहा विकू लागलो. विशेष म्हणजे, पोलिस आमच्याकडून हप्ता घेत नव्हते. दरम्यान, भजे गल्लीतील मित्रांची टिम जोरदार तयारी झाली होती. मी पान टपरी व नंतर भंगारचे दुकान सुरू केले. त्याचवेळी राजेश अग्रवाल यांनी एक पडलेल्या इमारतीची जागा साफ करुन देण्यास सांगितले. तेथील लोखंड व लाकडे विकून मला चांगले पैसे मिळाले. त्यामुळे मी हाच व्यवसाय निवडला. आज या व्यवसायात पंधरापेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. भुसावळ प्रमाणेच मलकापूर, रावेर, फैजपूर, औरंगाबाद येथील जुन्या इमारती पाडण्याचे काम मी केलेले आहे. आतापर्यंत चारशे-पाचशे इमारती पाडल्या असल्याचा दावा बब्बूदादा करतात. लॉकडाउन काळात सात इमारती पाडल्याचेही ते सांगतात. 

असे होते प्लॅनिंग 
बब्बूदादा कमी शिकलेले असले तरी कितीही मजली घर असो शेजारच्या घराला धक्का न लागू देता ते कौशल्याने पाडतात. म्हणून बांधकाम ठेकेदार बब्बूदादांची घर पाडण्यात पीएचडी झाली आहे, असे गमतीने म्हणतात. विशेषतः गल्ली बोळात व अडचणीच्या ठिकाणची घरेही त्यांनी सहज पाडली आहे. घर पाडण्यासाठी कोणी बोलावले निरीक्षण करून मनातल्या मनात प्लॅनिंग तयार करतात. यात कोणता भाग आधी पाडायचा? किती ताकद व वेळ लागू शकतो? यांचे नियोजन तयार होते. तशा सूचना मजुरांना देऊन कामास सुरवात होते. पाडलेल्या इमारतीचे लाकूड, लोखंड, रॅबीट, विटा विकून पैसै कसे कमवायचे याचे व्यवहारिक कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे. ते मजुरांची विशेष काळजी घेतात. मुलींचे लग्न असेल तर आर्थिक मदत करतात. कामाच्या ठिकाणी दुखापत झाली तर औषधोपचाराचाही खर्च ते करतात. 

बच्चे को भी ये बीझनेस मे...! 
बब्बूदादा यांचा मुलगा फय्याज बारावीचे शिक्षण घेत आहे. त्याची इंग्रजी देखील चांगली आहे. त्याला देखील याच व्यवसायात ठेवण्याचा बब्बूदादांचा मानस आहे तर लहान मुलगा शाबीर याला सिव्हिल इंजिनिअर करण्याचा विचार आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com