जळगाव जिल्ह्यात पिस्तुल तस्करांच्या टोळ्या सक्रिय !

विनोद सुरवाडे
Monday, 14 September 2020

गेल्या सहा महिन्यांपूर्वी अजनसोंडा येथून गावठी पिस्तुलासह एकाला ताब्यात घेण्यात आले होते. यासंबंधी वरणगाव पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.

वरणगाव  : गेल्या काही दिवसांपूर्वी भुसावळ शहरांत एकामागून एक असे देशी रिव्हॉल्व्हर मिळून आल्याच्या घटनांमुळे भुसावळ पोलिस प्रशासनाची झोपच उडाली होती; परंतु त्यावर पोलिसांनी नियंत्रण देखील मिळवले होते. मात्र, वरणगावात पोलिसांचा धाकच संपल्याने या टोळ्या सक्रिय होऊ पाहत आहेत. या टोळ्यांकडे शहरांसह परिसरातील सुशिक्षित तरुणांना आकार्षित करून गुन्हेगारीकडे वळविले जात आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी अंजनसोंडा येथून गावठी कट्ट्यासह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, परंतु आता नुकतेच येथील पोलिसांना मलकापूर शहर पोलिसांनी कोणताही सुगावा लागू न देता वरणगावातील दोघांना गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. 

आवश्य वाचा ः  खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले भुसावळ
 

वरणगाव हे सुरवातीचा काही काळ वगळता संवेदनशील म्हणून पोलिस दप्तरी नोंद आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरांत गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. सट्टा, जुगार, मटका, गुरांची अवैध वाहतूक, प्रवाशांची अवैध वाहतूक, विमल गुटख्याचा अवैध व्यवसाय, शहरांतून खेडेगावांमध्ये देशी दारूची अवैध वाहतूक, गावठी दारुच्या हातभट्टया अशा विविध लहान मोठ्या अवैध व्यवसायांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने यातून गुन्हेगारी वृत्ती जन्म घेत आहे. यातूनच दोन, वेळा पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याची पोलिसांत नोंद आहे. मारामाऱ्या, चोऱ्या, घरफोड्या, खुनाचा प्रयत्न, वाहने चोरी हे तर नित्त्याचे झाले आहे. आता तर शहरात गावठी पिस्तुल विकणाऱ्यांवर मलकापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी अजनसोंडा येथून गावठी पिस्तुलासह एकाला ताब्यात घेण्यात आले होते. यासंबंधी वरणगाव पोलिसांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे; अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेला बाधा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

आवर्जून वाचा ः  लिक्विड ऑक्सिजन मिळत नसल्याने उत्पादनात अडचण
 

बुलढाणा पोलिसांनी दोघांना वरणगावातून घेतले ताब्यात 

वरणगाव शहरातील एक व दर्यापूर शिवारातील एक अशा दोघांना मलकापूर (जि. बुलढाणा) पोलिसांनी शुक्रवारी (ता. ११) अटक केली. या प्रकारामुळे वरणगाव शहरात खळबळ उडाली आहे. मलकापूर शहरात गावठी कट्टा विक्रीसाठी दोन युवक येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मलकापूर बाजार समितीच्या आवारात सापळा रचून सागर संजय भंगाळे (वय २५, रा. सरस्वतीनगर वरणगाव) व संजय गोपाल चंदेले (वय ४५, रा. गोपाल मार्केट, दर्यापूर) या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याजवळ गावठी पिस्तुल व एक काडतूस आढळून आले. यामुळे मलकापूर शहर पोलिसांनी त्यांना अटक केली. तसेच विना क्रमांकाची बजाज प्लॅटिना दुचाकी जप्त केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरील दोघांना शनिवारी वरणगावात आणले होते. या मुळे भुसावळनंतर वरणगाव शहरातही गावठी कट्टे विक्रीचे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

शहरांसह वरणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. मलकापूर पोलिसांना आमच्या माध्यमातूनच संशयिताला देण्यात आले आहे आणि आमच्या गुप्त विभागाच्या नियत्रंणातून आम्ही इतर गुन्ह्याचा व गुन्हेगारांचा शोध घेत आहोत. 
- संदिपकुमार बोरसे 
सहाय्यक पोलिस निरीक्षक, वरणगाव  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal Crime is on the rise in Jalgaon district and gangs of village pistol sellers are active