किसान एक्स्प्रेसमुळे शेतमालास परराज्यात बाजारपेठ 

चेतन चौधरी
Monday, 10 August 2020

दर शुक्रवारी ही गाडी देवळाली येथून धावणार असून, शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायी ठरत आहे. अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांना आपला माल परराज्यात पाठविता येत आहे.

भुसावळ : शेतकऱ्यांच्या मालास व्यापक बाजारपेठ मिळून, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने किसान रेल सुरू केली. या गाडीचा शुक्रवारी (ता. ७) प्रारंभ झाला. पहिल्याच फेरीत भुसावळ येथून ३० टन माल दानापूरला गेला. किसान पार्सल रेलमुळे शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट  बिहारपर्यंत  जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

कोरोनाच्या संकट काळात देशाचा विकास थांबला, तरी शेतीक्षेत्र मात्र त्यापासून प्रभावित झालेले नाही. देशात कोठेही अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने किसान एक्स्प्रेस सुरू केली असून, एकूण दहा डब्बे असलेल्या या गाडीची क्षमता २१० क्विंटल माल वाहून नेण्याची आहे. 

किफायतशीर भाडे 
दर शुक्रवारी ही गाडी देवळाली येथून धावणार असून, शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायी ठरत आहे. अत्यंत कमी दरात शेतकऱ्यांना आपला माल परराज्यात पाठविता येत आहे. भुसावळ स्थानकातून दानापूरला माल पोचविण्यासाठी फक्त तीन रुपये किलो, तर तीन हजार रुपये क्विंटल भाडे लागते. इतक्या कमी दरात शेतकरी आपला माल बिहारमध्ये पाठवू शकणार आहेत. 
 
पहिलीच बहुपयोगी गाडी 
यापूर्वी भारतीय रेल्वेने केळी आणि इतर एकल पदार्थांच्या निर्यातीसाठी विशेष रेल्वे चालविली आहे. मात्र, ही पहिलीच बहुपयोगी गाडी असून, ती डाळिंब, केळी, द्राक्षे या फळांसह शिमला मिरची, फुलकोबी, शेवग्याच्या शेंगा, पत्ताकोबी, कांदे, मिरच्या या भाज्यांची वाहतूक करणार आहे. स्थानिक शेतकरी, मजूर, बाजार समिती आणि इतर व्यक्तींच्या सहाय्याने प्रभावी विपणन करण्यात येणार आहे. मागणीची एकत्रित नोंद केली जाईल. 

 
प्रमुख स्थानक व भाडे असे (प्रतिटन) 
नाशिक रोड- देवळाली ते दानापूर : ४००१ 
मनमाड ते दानापूर : ३,८४९ 
जळगाव ते दानापूर : ३,५१३ 
भुसावळ ते दानापूर : ३,४५९ 
खंडवा ते दानापूर : ३,१४८ 

 

संपादन-भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal kisan express thirty tons of goods shipped in the first round