
ट्रॅकमन हा भारतीय रेल्वेतील महत्वाचा घटक आहे आणि इतर विभागांच्या तुलनेत ट्रॅकमन आपला जीव धोक्यात घालून, कठोर परिश्रम करतात. भारतीय रेल्वेच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
भुसावळ : भारतीय रेल्वेतील महत्वाचा घटक असलेला ट्रॅकमन हा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. रेल्वे प्रशासनातर्फे कार्यस्थळी पुरेश्या सुविधा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना रेल्वे रुळावर जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. त्यामुळे या समस्यांकडे सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी ट्रॅकमन कामगारांनी गांधी जयंती पासून अभियान राबविण्यात येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले जात आहे.
ट्रॅकमन हा भारतीय रेल्वेतील महत्वाचा घटक आहे आणि इतर विभागांच्या तुलनेत ट्रॅकमन आपला जीव धोक्यात घालून, कठोर परिश्रम करतात. भारतीय रेल्वेच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. म्हणूनच ट्रॅकमन ला सन्मान देऊन, समस्या लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी केली आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी रेल्वे कामगार ट्रॅकमन असोसिएशनचे भुसावळ मंडल अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात आतापर्यंत भुसावळ येथील तीन हजार कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविले आहे.
या आहेत मागण्या
जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी. कठोर / जोखीम भत्ता 4100- 6000 ताबडतोब लागू करावा. कीमेन आणि पेट्रोलमेनच्या ड्युटीचे अंतर कमी केले पाहिजे. वैद्यकीय सुविधेत आई आणि वडील दोघांचा समावेश करावा. संरक्षक उपकरणे त्वरित वाटप करण्यात यावे. वरिष्ठ ट्रॅकमनला 4200 ग्रेट वेतन द्यावे. मल्टि स्कील केडर पॉलिसी ट्रॅकमेनसाठी देखील त्वरीत लागू करावी. ट्रॅकमनसाठी कोरोना वॉरियर विमा पॉलिसी प्रदान केली जावी. ग्रेड पे 1800 लेव्हल -1 पदावरील कर्मचाऱ्यांना कमीत कमी5 वर्षे सेवा ट्रॅकमेंटनेर साठी घ्यावे. गेटमन आणि ट्रॅकमनची ड्युटी 8 तास करावी आणि ड्युटीसाठी गणवेशासह सैनिकांसारखी सुरक्षा साधने दिली पाहिजेत.
रेल्वे ट्रॅकमन आपला जीव धोक्यात घालून रेल्वे पटऱ्यांवर काम करतात. मात्र याठिकाणी पुरेशा सुविधा नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गांधी जयंती पासून पत्र अभियान राबविण्यात येत आहे. आतापर्यंत तीन हजार कामगारांनी यात सहभाग घेतला आहे.
- प्रकाश जाधव, मंडळ अध्यक्ष आरकेटीए, भुसावळ.