गावठी कट्ट्याचे लोण खेडोपाडी; छुप्या मार्गाने तस्करी

चेतन चौधरी
Sunday, 27 September 2020

गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. तालुका पोलिसांनी पुन्हा दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या चार झाली आहे.

भुसावळ (जळगाव) : भुसावळ शहरापाठोपाठ आता तालुक्यातील ग्रामीण भागातही गावठी कट्ट्याचे लोण पसरत असून, गावठी कट्टे आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. वराडसीम (ता. भुसावळ) येथे गावठी कट्टे पोलिसांनी हस्तगत केले आहे. याप्रकरणी पुन्हा दोघांना अटक केली असून, अटकेतील आरोपींची संख्या आता चार झाली आहे. 
तालुक्यातील वराडसीम येथे गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना नऊ सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. तर गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. तालुका पोलिसांनी पुन्हा दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या चार झाली आहे. वराडसीम येथील पाण्याच्या टाकीजवळ राजेश रमेश तायडे (वय २७, रा. पाडळसे, ह. मु. असोदा), सचिन संतोष सपकाळे (वय २६, रा. वराडसिम) हे  गैरकायदा विनापरवाना १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा बळगताना मिळून आले. पुन्हा २० ला राजू टाक (रा. वाल्मिकनगर) व मयूर कैलास सपकाळे (रा. वराडसीम) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या संशयितांना न्यायालयात हजर केले असता २८ पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण व पोलिस पथकाने केली आहे. 

कुऱ्हे येथील व्यक्तीवर संशय 
वराडसीम येथे गावठी कट्ट्याची 'विक्री’ होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कुंभार यांना मिळताच त्यांनी वराडसीम येथे धडक दिली. गावाच्या पूवेला कुऱ्हे (पानाचे) येथील रस्त्याच्या जवळपास राहणाऱ्या व्यक्तींकडून हा व्यवहार होत असल्याचे त्यांना समजले. यावरून ही कारवाई करण्यात आली. 

कठोर कारवाईची मागणी 
यापूर्वी तालुक्यातील दीपनगर, खडका, चोरवड येथे छापा टाकून गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. तर मोंढाळा येथील एका संशयितास भुसावळ येथे गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. आता पुन्हा वराडसीम येथे गावठी कट्टा पकडण्यात आल्यामुळे ग्रामीण भागांमध्ये खळबळ उडाली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal village gawthi kattya gun smuggling