थरारक..दुचाकीवर मागून येत पिस्‍तुल काढली आणि पाच मिनिटात खेळ खल्‍लास

दीपक कच्छवा | Monday, 7 December 2020

दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी कापूस व्यापारी व त्याच्या सहकाऱ्याच्या डोक्यात लाकडी दांडा मारून अवघ्या 2 ते 5 मिनीटात हे काम फत्ते केले. या थरारक घटनेमुळे परिसरात एकच भितीचे वातावरण पसरले आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : दुचाकीवर आलेल्या तिघा अज्ञात व्यक्तींनी पिस्तूलचा धाक दाखवून लोंढे (ता. चाळीसगाव) येथील कापूस व्यापाऱ्याची सुमारे 20 लाख 6 हजाराची रक्कम असलेली बॅग घेऊन पोबारा केला. ही थरारक सिनेस्टाईल लुटीची घटना मालेगाव- चाळीसगाव रस्त्यावरील सायने शिवारात घडली. दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी कापूस व्यापारी व त्याच्या सहकाऱ्याच्या डोक्यात लाकडी दांडा मारून अवघ्या 2 ते 5 मिनीटात हे काम फत्ते केले. या थरारक घटनेमुळे परिसरात एकच भितीचे वातावरण पसरले आहे.

लोंढे (ता.चाळीसगाव) येथील सुनील श्रावण चौधरी यांचा कापूस खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. खरेदी केलेल्या कापसाचे पैसे हवालामार्फत एजंटकडे आल्याने हे पैसे शेतकऱ्यांना चुकते करण्यासाठी श्री. चौधरी हे आपले सहकारी सोनू पवार यांच्यासह शनिवारी सायंकाळी मालेगावी आले होते. मालेगावात असलेल्या सोयगाव चौफुलीवरून चौधरी यांनी संबंधीत व्यक्तींकडून कापूस चुकाऱ्याचे पैसे घेतले; व आपल्या (क्र. एमएच.19, ए.4206) या दुचाकीवरून आपले सहकारी सोनु पवार यांच्यासह 20 लाख रुपये सोबत घेऊन घराकडे निघाले. 

पाच मिनिटांत 20 लांबविले
पैसे घेऊन आपल्या गावी लोंढे ता.(चाळीसगाव)येथे येत होते. सोयगाव चौफुली ते सायने असा 20 ते 25 मिनीटांचा प्रवास झाला. सायने गावाच्या पुढे एक किमी अंतरावर चाळीसगावकडे येताच पाठिमागून दुचाकीवरुन आलेल्या तिघा भामट्यांनी चौधरी यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. यातील एकाने लाकडी दांडक्याने चौधरी यांच्यावर हल्ला केला. मात्र,दांडक्याचा मार चुकवत चौधरी यांनी दुचाकी वळवली. काही अंतर पुढे जात त्यांनी रस्त्याने येणाऱ्या काही ट्रकचालकांकडे मदतीची याचना केली. यावेळी तिघे संशयित पुन्हा चौधरी यांच्या पाठिमागे आले. चौधरींच्या दुचाकीचा पाठलाग करून एकाने पाठीमागे बसलेल्या पवार यांच्या मानेवर दांडक्याने मारले. यात ते खाली पडले. यावेळी अवघ्या पाच मिनीटात संशयितांनी चौधरी यांची दुचाकी थांबवून पिस्तूलचा धाक दाखवत त्याच्या हातातील रक्कम असलेली बॅग हिसकावून क्षणाधार्थ मालेगावच्या दिशेने पलायन केले.

Advertising
Advertising

संशयितांचा शोध सुरु
घटनेनंतर श्री. चौधरी यांनी आरडाओरड केली. मात्र, त्यांना कुणीही मदत केली नाही. यानंतर चौधरी यांनी मालेगाव तालुका पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे मिळून आले नाही. या लुटमारी प्रकरणी सुनील चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात मालेगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावर घडलेल्या या घटनेने वाहनधारकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे.

चोरट्यांची पाळत?
सुनील चौधरी हे कापूस व्यापारी आहेत.ही बाब बहुदा चोरट्यांना माहीत असावी. श्री चौधरी हे कापूस चुकाऱ्याचे पैसे घेण्यासाठी मालेगावला येत असल्याची व ते पुन्हा आपल्या गावाकडे जात असल्याची पक्की माहीती असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.त्यातून चोरट्यांनी श्री चौधरी यांचा पाठलाग करून सायनेजवळ अंधाऱ्या रात्री डाव हेरून 20 लाखाची रोकड डोळ्याची पापणी लवते न तोच पळवली. या लुटीच्या घटनेने लोंढेसह चाळीसगाव तालुक्यात कापूस व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे