esakal | ‘खाकी’च्या सतर्कतेमुळे वाचला दिव्यांग दांपत्याचा जीव !

बोलून बातमी शोधा

‘खाकी’च्या सतर्कतेमुळे वाचला दिव्यांग दांपत्याचा जीव !

भावाची समजूत काढली. परंतु वाद कायमच राहिला, याचे या दिव्यांग दांपत्याला वाईट वाटले.

‘खाकी’च्या सतर्कतेमुळे वाचला दिव्यांग दांपत्याचा जीव !

sakal_logo
By
चंद्रकांत चौधरी

पाचोरा : पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येसाठी गेलेल्या दिव्यांग दांपत्याचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. केवळ माहिती मिळाल्याबरोबर लगेचच सतर्कतेने शोधमोहीम राबविल्याने आत्महत्या करणाऱ्या दिव्यांग दांपत्याचा जीव वाचला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. 

आवर्जून वाचा- मलनिस्सारण’प्रकल्प उभारणीस विलंब; मनपावर खाते ‘सील’ची नामुष्की 
 

शिरपूर तालुक्यातील दिव्यांग तरुण पाचोरा येथे शासकीय कार्यालयात नोकरीस आहे. त्यांची पत्नीही दिव्यांग असून, तिचे माहेर पाचोरा येथील आहे. या दिव्यांग युवकाची आई व भाऊ शिरपूर येथे वास्तव्यास असून, त्यांचा संपूर्ण खर्च हे दिव्यांग दांपत्य करते. असे असताना भावाने वडिलांच्या व आईच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर आपला हक्क सांगत हिस्सा मागितल्याने वाद निर्माण झाल्याने हे दिव्यांग दांपत्य शिरपूर तालुक्यात गेले होते.

भावाने दिला नकार..

भावाची समजूत काढली. परंतु वाद कायमच राहिला, याचे या दिव्यांग दांपत्याला वाईट वाटले. कुटुंबाच्या सर्व खर्चाचा आर्थिक भार आपण उचलतो. असे असताना भावाने वाद घालावा हे पाहून हे दांपत्य कमालीचे नाराज झाले. आम्हीच आमचे जीवन संपवतो, सगळी मालमत्ता तू घे व आनंदात राहा, असे म्हणत हे दांपत्य घराबाहेर पडले व पाचोरा येथे परतले. या दांपत्यास १२ वर्षांचा मुलगा असून, पाचोरा येथे आल्यानंतर या मुलाला घरी सोडून त्यांनी गिरणा नदीपात्रात आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन ते गिरणा नदीपात्राकडे मार्गस्थ झाले. हा प्रकार पाचोरा पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेले पोलिस हवालदार राहुल बेहरे यांना त्यांच्या एका मित्राकडून कळाला.

आवर्जून वाचा- ज्येष्ठांचे लसीकरण लसीकरणाची उत्सुकता; पण केंद्राकडून मार्गदर्शन नाही  ​
 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने घेतला शोध

पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे व श्री. बेहरे हे आत्महत्येसाठी गेलेल्या दिव्यांग दांपत्याच्या शोधार्थ निघाले. स्थानिक गुन्हे शाखेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे या दिव्यांग दांपत्याची माहिती व लोकेशन काढून ते महादेवाचे बांबरुड (ता. पाचोरा) या परिसरात असल्याचे श्री. बेहरे यांना कळवले. त्यामुळे नलावडे व बेहरे यांनी आपला मोर्चा महादेवाचे बांबरुड गावाकडे वळवला. या गावाजवळच त्यांना दिव्यांग दांपत्याची तीचाकी सायकल लावलेली दिसली या परिसरातच दिव्यांग दांपत्य असावे म्हणून ते गिरणा नदीपात्रालगत त्यांचा शोध घेत असताना त्यांना दिव्यांग दांपत्य नदीकाठी आढळले. हे दांपत्य पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याच्या काही मिनिटे अगोदर नलावडे व बेहरे यांनी आत्महत्येपासून रोखण्याचा प्रयत्न केला व दोघांची समजूत घालून परत आणले व त्यांना घरी सोडले. 

संपादन- भूषण श्रीखंडे