अंगावर बर्फ पडल्याने जवानाचा मृत्यू; महिनाभरात चाळीसगाव तालुक्याने दुसरा जवान गमावला
गेल्या महिनाभरात चाळीसगाव तालुक्यातील दोन जवानांच्या मृत्यूने चाळीसगाव तालुक्यावर पुन्हा शोककळा पसरली आहे.
चाळीसगाव (जळगाव) : वाकडी (ता. चाळीसगाव) येथील जवान अमित साहेबराव पाटील (वय 32) हे बीएसएफमध्ये जम्मू- काश्मीर येथे कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांच्या अंगावर बर्फाची लादी पडून त्यांचा अपघात झाला होता. परंतु, आज सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गेल्या महिनाभरात चाळीसगाव तालुक्यातील दोन जवानांच्या मृत्यूने चाळीसगाव तालुक्यावर पुन्हा शोककळा पसरली आहे.
नक्की वाचा- आई-वडील मुलाला होकार कळविण्यासाठी गेले आणि घरी डाॅक्टर मुलीने असे भयंकर केले
वाकडी (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी साहेबराव नथु पाटील यांचे मोठे चिरंजीव अमित साहेबराव पाटील हे 2010 मध्ये बीएसएफ अर्थात बॉर्डर सिक्यूरिटी फोर्समध्ये कार्यरत झाले होते. जम्मू– काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना आठ दिवसांपूर्वी त्यांच्या अंगावर बर्फाची लादी कोसळली होती. यावेळी त्यांना तात्काळ बीएसएफच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आठवडाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. शहीद जवान अमित पाटील यांचे कुटुंब शेतकरी असून सर्वसामान्य परिस्थितीत त्यांनी हालाखीची जीवन जगत सैन्य भरतीत रुजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि लहान भाऊ असा परिवार आहे. अमित पाटील हे शहीद झाल्याची माहिती कळतात वाकडी गावावर शोककळा पसरली.
आज रात्री उशिरापर्यंत पार्थिव येणार
शहीद जवान अमित पाटील यांचे पार्थिव आज रात्री जम्मू-काश्मीर वरून पुणे येथे घेण्यात येणार आहे. त्यानंतर ते चाळीसगाव तालुका तील वाकडी येथे त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून अद्याप वेळ निश्चित नसल्याची माहिती त्यांचे मित्र अतुल पाटील व बालासाहेब पाटील यांनी दिली.
संपादन ः राजेश सोनवणे