पोलिस असल्‍याचे सांगत हातचलाखीने वृद्धेला लुटले

दीपक कच्छवा
Tuesday, 8 December 2020

आम्ही पोलीस असून शहरात रोज चोरीच्या घटना होत आहेत. तुम्ही तुमच्या दोन्ही हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा असे सांगितले. 

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : आम्ही पोलीस असून शहरात दररोज चोऱ्या होत आहेत. त्यामुळे तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा अशी बतावणी करीत दोघा भामट्यांनी हातचलाखी करत 80 वर्षीय वृद्धेच्या 60 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या लंपास केल्याची घटना भडगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी दोघा अनोळखी भामट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव बसस्थानकामागे लक्ष्मीनगर येथील रहिवासी असलेल्या इंदुबाई धोंडू शिरूडे (वय 80) ह्या सोमवारी (7 डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास भडगाव रोडवरील भारत पेट्रोलियमजवळ श्रीपतनगरमध्ये नातेवाईकांकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पहात रस्त्याच्या कडेला उभ्या होत्‍या. या दरम्‍यान 40 ते 45 वर्षे वयाचे दोन अनोळखी व्यक्ती या वृद्धेजवळ आले. आम्ही पोलीस असून शहरात रोज चोरीच्या घटना होत आहेत. तुम्ही तुमच्या दोन्ही हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवा असे सांगितले. 

कागदात गुंडाळत केली हातचलाखी
इंदुबाई शिरूडे यांनी हातातील बांगड्या काढता येत नसल्याने दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील बांगड्या काढल्या व एका कागदात गुंडाळून ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे बांगड्या कागदात ठेवल्या. त्यानंतर हे इसम दुचाकीवरून बसस्थानकाच्या दिशेने निघुन गेले. थोड्यावेळाने इंदुबाई शिरूडे यांच्या लक्षात आले की, 30 ग्रॅम वजनाच्या 60 हजार रूपये किंमतीच्या दोन पाटल्या (बांगड्या) या भामट्यांनी त्यांची दिशाभूल व हातचलाखी फसवणूक करून पळवून नेल्या. इंदुबाई यांनी यानंतर घर गाठले व मुलास ही आपबित्ती सांगितली. यादरम्यान इंदुबाई शिरूडे यांची तब्येत बिघडल्याने औषध उपचार घेऊन आज मंगळवारी त्यांनी शहर पोलीसात धाव घेऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली. 
याप्रकरणी इंदुबाई शिरूडे यांनी दिलेल्या फिर्यादी दोघा अज्ञात भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघा भामट्यांचे वर्णन
भर दिवसा आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या धाडसी लुटमारीच्या घटनेनेमुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धेला ज्या भामट्यांनी लुबाडले त्यापैकी एक जण अंदाजे 40 ते 50 वय, रंगाने गोरा, शरीराने मजबूत, मराठी भाषा बोलणारा, चेहरा लांबट, अंगात पांढऱ्या रंगाचे फुल बाहीचा शर्ट व फुल काळसर रंगाची पॅन्ट तर दुसरा भामटा वय अंदाजे 40 ते 45, रंगाने सावळा, शरीराने मजबूत, चेहरा गोल,मराठी भाषा बोलणारा, अंगात फुल बाह्यांचा चेक शर्ट व काळसर रंगाची फुल पॅन्ट असे वर्णन वर्णन आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon fraud police old women gold ring robbery