ट्रकच्‍या धडकेत झाड पडले बैलगाडीवर...ट्रकला मागून मोटारसायकल धडकली; दोघांचा मृत्‍यू

दीपक कच्‍छवा
Saturday, 11 July 2020

धुळ्याकडून चाळीसगावकडे येत असलेल्या ट्रकला समोरून जाणाऱ्या ट्रकच्या डिझेल टाकीचा धक्का लागला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व तो ट्रक रस्त्याच्या कडेला कडुनिंबाच्या झाडावर आदळला. ही धडक इतकी भीषण होती, की ट्रकच्या धडकेने झाड रस्त्याच्या बाजूला कोसळले.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : धुळ्याकडून चाळीसगावकडे जाणाऱ्या ट्रकला समोरून येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक झाडावर आदळला. ट्रकच्या धडकेत झाड कोसळले. त्याचवेळी ट्रकमागून भरधाव येणारी दुचाकी ट्रकमध्ये घुसल्याने गायरान भोरस (ता. चाळीसगाव) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा विचित्र अपघात शनिवारी (ता. ११) सायंकाळी चाळीसगाव - धुळे महामार्गावर मेहुणबारे गावाजवळ घडला. 
चाळीसगावकडून ट्रक (एमएच १८, ३६७५) धुळ्याकडे जात होता. तर दुसरा ट्रक (एमएच १८, बीजी ३१२३) हा ट्रक धुळ्याकडून चाळीसगावकडे येत होता. मेहुणबारे येथे माऊली गॅरेजवळ धुळ्याकडून चाळीसगावकडे येत असलेल्या ट्रकला समोरून जाणाऱ्या ट्रकच्या डिझेल टाकीचा धक्का लागला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व तो ट्रक रस्त्याच्या कडेला कडुनिंबाच्या झाडावर आदळला. ही धडक इतकी भीषण होती, की ट्रकच्या धडकेने झाड रस्त्याच्या बाजूला कोसळले. त्याचवेळी शेताकडून घराकडे जाणाऱ्या मेहुणबारे येथील एका शेतकऱ्याची बैलगाडी या कडुनिंबाच्या झाडाखाली सापडली. त्यात एक बैल गंभीर जखमी झाला. शेतकऱ्याचे दैव बलवत्तर म्हणून तो वाचला. या शेतकऱ्याच्या पाठीमागून येणाऱ्या एका भाजीपाला विक्रेत्याचीही गाडीही झाडाखाली अडकली. सुर्देवाने हातगाडीचालकही बचावला. झाडाला धडकलेल्या ट्रकची डिझेल टाकी फुटून रस्त्यावरच डिझेल पसरले. सुर्देवाने स्फोट झाला नाही; अन्यथा अनर्थ घडला असता. 

दोघांसाठी काळ ठरला कर्दनकाळ 
धुळ्याकडून चाळीसगावकडे येणाऱ्या ट्रकला समोरून येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकचे रॉड तुटल्याने ट्रक झाडाला जावून आदळला. त्याचवेळी चाळीसगावकडून धुळ्याकडे जाणारी (एमएच १९, ९५०३) ही दुचाकी झाडाला धडकलेल्या ट्रकमध्ये घुसली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील दोघे तरूण जागीच ठार झाले. पंकज हरी येवले (वय ३८), किरण मिलिंद मोरे (३२) (दोन्ही रा. गायरान भोरस, ता. चाळीसगाव) असे ठार झालेल्या दोघा तरुणांचे नाव आहे. 

वाचविण्यासाठी धावले ग्रामस्थ 
अपघात झाल्याची माहिती कळताच मेहुणबारे ग्रामस्थ घटनास्थळी धावले. अपघातातील जखमींना दवाखान्यात दाखल करण्यासाठी त्यांनी मदत केली. या अपघातामुळे चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील वाहतूक एका बाजून काही वेळ ठप्प झाली होती. मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले. दोघांचा मृतदेह चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात आला. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 
संपादन : राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon highway truck accident two death