भाव मिळेल या आशेने आसू पुसले...आता आसूही निघेना

onion no rate market
onion no rate market

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : एकीकडे शेतीमालाला भाव नाही, दुसरीकडे कोरोनाचा कहर या चक्रात अडकलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता चांगलाच फटका बसला आहे. भाव मिळेल या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्याने तो अक्षरश: मातीमोल ठरला असून, चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. 

चाळीसगाव तालुक्यात गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळी हंगामात सुमारे दोन हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. मुबलक पाण्यामुळे कांद्याचे पीकही भरघोस आले. दोन पैसे जास्त मिळतील, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी चाळीतच कांदा साठवून ठेवला. मात्र, हा कांदाच आता मातीमोल ठरला आहे. भाव मिळेल म्हणून कांदा चाळीतून बाहेर काढला नाही. परिणामी, वाढत्या तापमानाचा फटका कांद्याला बसला. त्यात मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. त्याचाही फटका बसला. काही शेतकऱ्यांनी ३०० ते ४०० रूपये क्विंटल या मातीमोल दराने कांदा विक्री काढला. त्यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. काही शेतकऱ्यांनी कांदा शेतातच फेकून दिला. कांदा चाळीतच सडल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. 


आर्थिक मदतीची अपेक्षा 
चाळीसगाव तालुक्यात गतवर्षी १५०० ते १६०० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली होती. यंदा चांगल्या पावसामुळे ही लागवड दोन हजार हेक्टरवर गेली. मात्र, भाव आणि कोरोनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा घात केला. भावही मिळाला नाही, उष्णतेमुळे सडलेला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. 

संपादन : राजेश सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com