esakal | लोकसहभागातून ११ गावांत जलसमृद्धी 
sakal

बोलून बातमी शोधा

public participation

तालुक्यातील ११ गावांना सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून वंडरलँड व मीडिया ओशन कंपनीने जलसंधारणाच्या कामासाठी जेसीबीची मदत केली. ते उपलब्ध झाल्याने ज्या नदी- नाल्यालगत जे शेतकरी आहेत, त्यांनी वर्गणी करून जेसीबीमध्ये डिझेल टाकून काम पूर्ण केले.

लोकसहभागातून ११ गावांत जलसमृद्धी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जळगाव) : ‘गाव करी ते राव काय करी’ अशी प्रसिद्ध म्हण आहे. गावाने ठरविले तर अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. मात्र, यासाठी आवश्यक असतो लोकसहभाग व या लोकसहभागाला जोड मिळाली चाळीसगाव तालुक्यात सुरू झालेल्या शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियानांतर्गत ‘मिशन-५०० कोटी लिटर जलसाठा’ या अभियानाची. या अभियानाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील ११ गावांमध्ये ‘जलक्रांती’ निर्माण झाली आहे. 
आमदार मंगेश चव्हाण, आयकर उपायुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण व पुणेस्थित मूळ कळमडू गावाचे सुपुत्र सॉफ्टवेअर इंजिनिअर गुणवंत सोनवणे यांनी एकत्र येत तालुक्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलचळवळ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यात प्रशिक्षण, जनजागृती व लोकसहभागातून नदी- नाल्यांचे खोलीकरण करून ५०० कोटी लिटर जलसाठा निर्माण करण्यासाठी तालुकास्तरीय स्पर्धा घेण्याचा संकल्प करण्यात आला. आमदार चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण अध्यक्ष असलेल्या शिवनेरी फाउंडेशनने यात सक्रियपणे सहभाग घेतला. या अभियानाला ‘शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियान मिशन- ५०० कोटी लिटर जलसाठा निर्माण स्पर्धा-२०२०’ असे नाव देण्यात आले. याअंतर्गत यावर्षी ब्राह्मणशेवगे, नाईकनगर, पिंप्री बुद्रुक प्र. दे., खडकीसीम, चैतन्यनगर, कढरे, जामदा, इच्छापूर, पोहरे, चिंचगव्हाण, सुंदरनगर व कळमडू आदी गावांमध्ये शोषखड्डे, जलसंधारण व नदी-नाला खोलीकरण अशी कामे करण्यात आली. दरम्यान, आभोणे तांडा येथे निवासी ट्रेनिंग सेंटर उभारून ५० गावांना शास्त्रोक्त प्रशिक्षणही देण्यात आले. 
आमदार चव्हाण यांच्या हस्ते ब्राह्मणशेवगे, जामदा व चैतन्यतांडा येथे जलसाठ्याचे जलपूजन झाले. या वेळी अभियानाचे मार्गदर्शक गुणवंत सोनवणे, पंचायत समितीचे गटनेते संजय पाटील, बाजार समितीचे सभापती सरदारसिंग राजपूत, पंचायत समितीचे सदस्य पीयूष साळुंखे, चैतन्यनगरचे सरपंच दिनकर राठोड, जामद्याचे सरपंच गोकुळ पाटील, इच्छापूरचे सरपंच नीलेश राठोड, नगरसेविका सविता राजपूत, दयाराम सोनवणे, सोमनाथ माळी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुनील पवार, आबा पाटील, राहुल पाटील, बाबासाहेब नेरकर, नीलेश चिंचोले, पुजारी बाबा, ग्रामसेवक चव्हाण, आनंदा जाधव, राहुल राठोड आदी उपस्थित होते. 

जलसाठा दृष्टिक्षेपात... 
तालुक्यातील ११ गावांना सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून वंडरलँड व मीडिया ओशन कंपनीने जलसंधारणाच्या कामासाठी जेसीबीची मदत केली. ते उपलब्ध झाल्याने ज्या नदी- नाल्यालगत जे शेतकरी आहेत, त्यांनी वर्गणी करून जेसीबीमध्ये डिझेल टाकून काम पूर्ण केले. या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात एकूण काम पाच लाख ३३ हजार ७२८ घनमीटर झाले आहे. त्यामुळे एका पावसाचा होणारा जलसाठा ५३ कोटी ३७ लाख २८ हजार २२२ लिटर इतका झालेला आहे. आपण १० पावसांचा विचार केला, तर तो जलसाठा ५३३ कोटी ७२ लाख ८० हजार लिटर इतका महाप्रचंड प्रमाणात झाला आहे.