वऱ्हाडीच्या अंगावर खाजेची वस्तू टाकून लाखोच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला 

दिपक कच्छवा
Wednesday, 9 December 2020

अंगावर कोणीतरी पाठीमागून काहीतरी वस्तू फेकली. यामुळे राजू कुमावत यांच्या सासूबाई यांच्या अंगाला खाज आल्याने त्यांनी ही पर्स खाली ठेवली.

चाळीसगाव  ः लग्नसमारंभात वऱ्हाडीच्या अंगावर खाज येण्याची वस्तू टाकून जवळपास साडेतीन लाखांचा सोन्याचा दागिन्यांसह रोकड असा ऐवज लंपास केल्याची घटना चाळीसगाव शहरातील एका मंगल कार्यालयात घडली. याप्रकरणी खळबळ उडाली असून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आवश्य वाचा- बीएचआर’ घोटाळ्यातील ‘म्होरक्या’ला पोलिस कधी पकडणार ?

चाळीसगाव शहरातील धुळे रोड स्थित विराम लॉन्स येथे शहरातील श्री स्वामी नगरातील रहिवासी राजू कुमावत यांच्या मुलीचा मंगळवारी (ता. ८) विवाह होता. हळदीचा कार्यक्रम देखील या ठिकाणी असल्याने कुमावत व त्यांचे कुटुंबीय सोमवारी (ता. ७) सायंकाळपासूनच या लॉन्स मध्ये आले होते. मंगळवारी विवाह सुरू असताना कुमावत यांच्या पत्नीकडे पर्स होती. त्यात ९८ हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व लग्नासाठी बँकेतून काढलेली एक लाख ९० हजार रुपयांची रोकड होती तसेच अन्य २५हजार रुपयांची रोकड व अन्य काही वस्तू असा जवळपास तीन लाख ४५ हजार पाचशे रुपयांचा ऐवज त्यांच्याकडे होता.

पर्स सासूबाईकंडे खाली ठेवली अन..

पर्स त्यांनी आपल्या सासूबाईकडे दिली आणि सासूबाई व काही नातेवाईक हे लॉन्स मध्ये उभे होते. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या अंगावर कोणीतरी पाठीमागून काहीतरी वस्तू फेकली. यामुळे राजू कुमावत यांच्या सासूबाई यांच्या अंगाला खाज आल्याने त्यांनी ही पर्स खाली ठेवली व परत घेण्यासाठी पुन्हा मागे वळल्या असता ही पर्स काही सेकंदातच गायब झाली. याप्रकरणी राजू कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon thieves stole lakhs of jewelery by throwing itchy items at the wedding