मजुराची पैशाची पिशवी हरविली; बाप्‍पा पावले अन्‌ त्याच्या घरी आली परत

home guard
home guard

मेहुणबारे (जळगाव) : सध्याच्या संधीसाधू आणि मतलबी जगात अद्यापही माणूसकी टिकून राहिल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. चाळीसगाव येथील होमगार्डमध्ये कार्यरत आसलेल्या दोघांनी रस्त्यावर पडलेली कॅरीबॅग व त्यातील आधारकार्डसह असलेली चार हजाराची रोकड संबंधीत गरीब मजुराला परत केली. काबाडकष्ट करून पै पै जमवलेले चार हजार रूपये हरवल्याने या मजुराच्या जीवाची घालमेल झाली. मात्र होमगार्डतील दोघेजण देवरूपाने धावून आले आणि कुठलेही आढेओढे न घेता संबधीत मजुराच्या घरी जावून ते पैसे परत केले.

पिंपरखेड तांडा (ता.चाळीसगाव) येथील भगवान ओंकार जाधव हे पत्नीसह तीन दिवसापूर्वी चाळीसगाव येथे बाजाराला आले होते. शिवाजी चौकातून गणेश रोडकडे येत असतांना जाधव यांनी कॅरीबॅग बाजुला उभ्या असलेल्या मोटारसायकलवर ठेवली. त्यावेळी त्यांना वाटले की पत्नीने पैशासह ती कॅरीबॅग घेतली. दोघेजण पुढे मार्गस्थ झाले. पुढे दुकानात गेल्यावर कॅरीबॅगच नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शोधाधोध केली पण मिळून आली नाही. त्यामुळे ते दुखी चेहऱ्याने घरी परतले. 

असाही प्रामाणिकपणा
भगवान जाधव यांचे आधारकार्ड आणि रोख चार हजाराची रोकड असलेली ही कॅरीबॅग शिवाजी चौकाजवळच दुकानावर बसलेले हे दोन्ही होमगार्ड अधिकारी शंकर सैंदाणे व कालू किसन जाधव (मेहुणबारे ग्रामपंचायतचे कर्मचारी) यांना दिसली. दोघांनी ही कॅरीबॅग उचलून पाहिले असता त्यामध्ये आधारकार्ड व रोकड रक्कम दिसून आली. त्यांनी आजुबाजुला  विचारपूस व शोधाशोध केली पण कोणी पुढे आले नाही.त्या  कॅरीबॅगमधील आधारकार्डवरील नाव पाहीले असता ते पिंपरखेड (ता.चाळीसगाव)येथील भगवान जाधव यांचे असल्याचे समजले. दोघांनी प्रामाणिकपणे पिपंरखेड येथे पैसे परत करण्याचे ठरविले.

दोघांनी केले पैसे परत
श्री सैंदाणे व श्री जाधव या दोघांनी मोटारसायकलवरून तडक पिंपरखेड गाठले व तेथील सरपंचांना या प्रकाराची माहिती दिली.त्यानंतर भगवान जाधव यांच्या घरी जावून आधारकार्डसह चार हजार रूपये असलेली कॅरीबॅग त्यांच्या सुपुर्द केली. हरवलेले आधारकार्डसह चार हजार रूपयांची रोकड परत मिळाल्याने भगवान जाधव यांच्या कुटंबाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहीले. भगवान जाधव यांची अत्यंत गरीबीची परिस्थिती आहे. काबाडकष्ट करून त्यांनी घरातील किराणा सामानासाठी पै पै जमवली होती.हे पैसेच हरवल्याने त्यांच्या जीवाची घालमेल झाली. मात्र होमगार्ड अधिकारी शंकर सैंदाणे व कालू जाधव यांनी समाजात अद्यापही माणुसकी जीवंत असल्याचा प्रत्यय आणून देत हरवलेली ही पिशवी व त्यातील रोकड घरी जावून परत केली.या प्रामाणिकतेचे पिंपरखेड सरपंचांनी दोघांचे कौतुक करून आभार मानले.

संपादन : राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com