esakal | चोपड्यात रेमेडेसिव्हिरचा तुटवडा, रुग्णांच्या जिवाशी होतोय खेळ 
sakal

बोलून बातमी शोधा

चोपड्यात रेमेडेसिव्हिरचा तुटवडा, रुग्णांच्या जिवाशी होतोय खेळ 

कोविड सेंटरसह शहरात कुठेही हे रेमेडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध नाहीत. दाखल रुग्णांमध्ये अनेक रुग्ण अत्यवस्थ आहेत,

चोपड्यात रेमेडेसिव्हिरचा तुटवडा, रुग्णांच्या जिवाशी होतोय खेळ 

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा : चोपडा तालुक्यात काही दिवसांपासून रेमेडेसिव्हिरसह ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. याबाबत नुकतीच खासदार रक्षा खडसे यांनी तालुक्यात बैठक घेऊन औषध व ऑक्सिजनच्या साठ्याबाबत तालुका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. परंतु अद्यापही तुटवडा कायम आहे. रेमेडेसिव्हिर कुठेच शिल्लक नसल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे की काय..? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. 

आवश्य वाचा- महिला हॉस्पिटलमध्ये जंबो कोविड केअर सेंटर 
 


चोपडा शहरात एकूण सहा खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये ४४६ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी प्रदीप लासूरकर यांनी खासदारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत माहिती दिली होती. या रुग्णांना रोज रेमेडेसिव्हिरचा डोस द्यावा लागतो. कोविड सेंटरसह शहरात कुठेही हे रेमेडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध नाहीत. दाखल रुग्णांमध्ये अनेक रुग्ण अत्यवस्थ आहेत, अशा वेळी त्यांना इंजेक्शन उपलब्ध न झाल्यास मृतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


रोज गरज ४०० इंजेक्शनची आवश्यकता 
शहरात सहा खाजगी कोविड सेंटर असून, यात ‘सकाळ’च्या पाहणीत शुक्रवारी (ता. २) एकही रेमेडेसिव्हिर शिल्लक नव्हती. याबाबत ‘सकाळ’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष कोविड सेंटरमध्ये किती रुग्ण दाखल आहेत, किती रेमेडेसिव्हिर शिल्लक आहेत, रोज किती रेमेडेसिव्हिरची गरज असते...याची माहिती घेतली असता एकही सेंटरमध्ये शिल्लक साठा नसल्याने दाखल रुग्णांना अडचणी येत आहेत. खासगी कोविड सेंटरचे नाव, दाखल रुग्ण संख्या, कंसात रोज इंजेक्शनची गरज अशी ः हरताळकर हॉस्पिटल- ५० (६५), नृसिंह हॉस्पिटल- ३५ (१००), पाटील हॉस्पिटल- ७० (७५), सुविचार हॉस्पिटल- ३० (४५), साई हॉस्पिटल- २५ (३०), चैतन्य हॉस्पिटल- ३० (३५), जनसेवा हॉस्पिटल- ३० (५०) असे एकूण २७० अत्यवस्थ रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून, त्यांना रोज एकूण ४०० रेमेडेसिव्हिरची गरज असते. 

आवश्य वाचा-  नगरसेवक अपात्र प्रकरण; तीस हजार पानांचा अभ्यास कधी होणार? 

ऑक्सिजन सिलिंडरचीही कमतरता 
शहरात रेमेडेसिव्हिर कुठेच शिल्लक नसल्याने ते मिळत नाही. त्यातच ऑक्सिजन सिलिंडरचीही कमतरता असल्याने आणखी दुसरी अडचण वाढली आहे. जिल्ह्यात एकच पुरवठाधारक असल्याने ऑक्सिजन सिलिंडरचीही कमतरता भासत आहे. यामुळे कोविड सेंटरच ‘गॅस’वर असल्याचे दिसून येत आहे. एका दिवसाला पुरेल एवढा साठा आहे. प्रत्येक हॉस्पिटलला दिवसाला ४० ते ५० सिलिंडर लागतात.  

जळगाव

संपादन- भूषण श्रीखंडे