esakal | घरबल्या पंधरा वर्षांपासून पिता-पुत्राची अशी ही राष्ट्रसेवा !
sakal

बोलून बातमी शोधा

घरबल्या पंधरा वर्षांपासून पिता-पुत्राची अशी ही राष्ट्रसेवा !

तिरंग्याची घरबसल्या कशी सेवा करता येईल, या उद्देशातून आम्ही ध्वजाची मोफत इस्त्री करीत आहोत. ही सेवा असली तरी ती करण्याचे भाग्य लाभले.

घरबल्या पंधरा वर्षांपासून पिता-पुत्राची अशी ही राष्ट्रसेवा !

sakal_logo
By
अमोल महाजन

धानोरा (ता.चोपडा) : तिरंगा केवळ राष्ट्रध्वजच नव्हे, स्वातंत्र्याची चेतना, देशभक्तीची प्रेरणा अन्‌ राष्ट्रसेवेची साधना, अशा अनेक भावना या तिरंग्याशी जुळलेल्या. थेट सीमेवर जाऊन देशभक्तीचा प्रत्यय देणे प्रत्येकाच्या नशिबी असतेच, असे नाही. मात्र, विविध क्षेत्रांत सेवा करतानाही आपण राष्ट्रभक्तीचे उदाहरण घालून देऊ शकतो. धानोऱ्याील परीट (धोबी) समाजाच्या पिता-पुत्रांनी त्याचाच प्रत्यय दिला. १५ वर्षांपासून प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनासाठी लागणाऱ्या राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री करून देत देशभक्ती सेवेचा अनोखा प्रत्यय दिलाय. 

धानोऱ्यात लॉन्ड्री व्यवसाय करणारे प्रकाश खैरे व मुलगा आकाश या दोघांनीही १५ वर्षांत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद मराठी शाळा, आश्रमशाळा, माध्यमिक विद्यालय, पीक संरक्षण सोसायटी, विविध कार्यकारी सोसायटी, दूध डेअरी आदी ठिकाणी स्वातंत्र्यदिनी तसेच प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिनासाठी ध्वजवंदनासाठी लागणाऱ्या तिरंग्याची मोफत इस्त्री करून दिलीय. त्यांनी आतापर्यंत जवळपास आठशे राष्ट्रध्वजांना इस्त्री करून दिली आहे. 

देशभक्तीचा जागर 
स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी गावातील, परिसरातील शाळा व सहकारी संस्थांतील कर्मचारी राष्ट्रध्वज इस्त्रीसाठी घेऊन येतात. यासाठी काही जण त्यांना पैसेही देऊ करतात. मात्र, तिरंग्याची घरबसल्या कशी सेवा करता येईल, या उद्देशातून आम्ही ध्वजाची मोफत इस्त्री करीत आहोत. ही सेवा असली तरी ती करण्याचे भाग्य लाभले, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचे प्रकाश सांगतात. 

मुलानेही स्वीकारला व्यवसाय 
प्रकाश खैरे यांचा मुलगा आकाश पदवीधर असून, नोकरी न मिळाल्याने तोही वडिलांच्या पारंपरिक लॉन्ड्री व्यवसायास हातभार लावत आहे. त्याने आजपर्यंत ४०० राष्ट्रध्वजांची इस्त्री केली आहे. 


वडील आपल्या पिढीजात पारंपरिक व्यवसायातून राष्ट्रध्वजाची मोफत इस्त्री करून देण्याच्या या निस्सिम देशसेवेला यापुढेही सुरूच ठेवणार असून, सैनिक होऊन देशसेवा करणे भाग्यात नसले, तरी घरी बसून देशभक्ती करण्याचा मला अभिमान वाटतो. 
-आकाश खैरे, लॉन्ड्री व्यावसायिक  

 संपादन- भूषण श्रीखंडे

loading image