
दुपारी दोनच्या सुमारास बाबू लतिफ काझी याच्या मालकीचे पत्र्याचे छत असलेल्या गुदामात आकाश योगेश अग्रवाल (रा. चोपडा, जि. जळगाव) याने भाडेतत्त्वावर घेऊन त्यामध्ये गुटखा, सुंगधित तंबाखू व इतर असे प्रतिबंधित पदार्थ विक्री करण्याच्या इराद्याने बेकायदेशीररीत्या साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाली
चोपडा (जळगाव) : पोलिस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाने चोपडा येथे धडक कारवाई करीत गुटख्यासह सात लाख ३२ हजार ६७२ रुपयांचा ऐवज जप्त करून अवैध मार्गाने प्रतिबंधित गुटखा जप्त केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
येथील गुजराती गल्लीत हेगडेवार चौक या ठिकाणी शनिवारी (ता. ३१) दुपारी दोनच्या सुमारास बाबू लतिफ काझी याच्या मालकीचे पत्र्याचे छत असलेल्या गुदामात आकाश योगेश अग्रवाल (रा. चोपडा, जि. जळगाव) याने भाडेतत्त्वावर घेऊन त्यामध्ये गुटखा, सुंगधित तंबाखू व इतर असे प्रतिबंधित पदार्थ विक्री करण्याच्या इराद्याने बेकायदेशीररीत्या साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आकाश अग्रवाल (वय २८, रा. गुजराती गल्ली, चोपडा) याला गुदाम उघडण्यास सांगितले. गुदामात दोन लाख ३५ हजार ८४० रुपये किमतीचा प्रतिबंधित सुंगधित तंबाखू व पानमसाला मिळून आला. तसेच नागलवाडी रोड येथील जयहिंद कॉलनीत अजय अरुण पाटील याने स्वत:च्या राहत्या घरात सुगंधी तंबाखू, गुटखा, तंबाखू व इतर प्रतिबंधित पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या साठा करून चोरटी विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या आधारे अजय पाटील (वय २८, रा. जयहिंद कॉलनी, नागलवाडी रोड, चोपडा) यास संबंधित खोली उघडण्यास सांगितले असता, प्रतिबंधित तंबाखू व पानमसाला आढळून आला. तसेच त्याच्या ओमनी व्हॅनमध्येही (एमएच १९, सीयू ६१३२) ही प्रतिबंधित सुंगधित तंबाखू व पानमसाला मिळून आला. त्याच्याकडून तीन लाख ४६ हजार ८३२ रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व पानमसाला व वाहन, असा एकूण चार लाख ९६ हजार ८३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, संदीप पाटील, राजेंद्र सोनवणे, नितीन सपकाळे, विश्वेश हजारे, दीपक ठाकूर, सुरेश ठोंगारे, केतन पाटील यांनी केली.