esakal | राज्यातील दहावी बारावीतील नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा लटकली 
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील दहावी बारावीतील नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा लटकली 

या वर्षी कोरोना संसर्गजन्य परिस्थिती असल्याने परीक्षेस विलंब लागणार आहे? किंबहुना ही फेरपरीक्षा घेतली जाईल किंवा नाही याची शक्यताही धूसर आहे.

राज्यातील दहावी बारावीतील नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा लटकली 

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांवर अनुत्तीर्णाचा शिक्का बसू नये, यासाठी दर वर्षी निकाल लागल्यावर तत्काळ फेरपरीक्षा घेऊन या विद्यार्थ्यांना वर्ष वाचविण्याची संधी दिली जाते. मात्र, यंदा कोरोना संसर्गजन्य परिस्थिती असल्याने ही परीक्षा होईल किंवा नाही याबाबतची शक्यता धूसर आहे. यामुळे विलंब लागल्यास विद्यार्थ्यांपुढे अडचणी निर्माण होणार असून, नऊ विभागीय मंडळांतील दहावीच्या ७३ हजार ९९८ नियमित अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी जुलैमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येते. मात्र, या वर्षी कोरोना संसर्गजन्य परिस्थिती असल्याने परीक्षेस विलंब लागणार आहे? किंबहुना ही फेरपरीक्षा घेतली जाईल किंवा नाही याची शक्यताही धूसर आहे. गेल्या काही वर्षांपासून ही परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येत होती. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा होण्याची शक्यता फारच कमी आहे. 

फेरपरीक्षेवर प्रश्‍नचिन्ह 
यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही अजून घोळ सुरू आहे. यातच दहावी, बारावीसाठीच्या फेरपरीक्षा कशा होतील, याबाबतही प्रश्‍नचिन्हच आहे. राज्य मंडळाचा बारावीचा निकाल दीड महिना उशिरा जाहीर झाला, तर दहावीचा निकाल जुलैअखेर जाहीर झाला. यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव ऑगस्टमध्ये कायम आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये ही परीक्षा घेणे अजिबात शक्य नाही. मग या परीक्षा कधी होतील? 

सर्व काही स्थितीवर अवलंबून 
कोरोनामुळे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणारी फेरपरीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्येच घेतली जाण्याची शक्यता आहे. परंतु त्या वेळची परिस्थिती, राज्य शासनाचा निर्णय यावर सर्व काही खेळ अवलंबून आहे. परीक्षा न झाल्यास या विद्यार्थ्यांना मार्चमध्ये एकच संधी मिळेल. यासाठी या विद्यार्थ्यांबाबत विभागीय मंडळांनी बैठक घेऊन यावर निर्णय होणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

अशी आहे विद्यार्थिसंख्या 
राज्यातील नऊ विभागीय मंडळांत दहावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी (नियमित), कंसात अनुत्तीर्ण विद्यार्थिसंख्या 
- कोकण ३३ हजार ६८६ (४१५) 
- लातूर १ लाख ७ हजार ७७३ (७ हजार ४४७) 
- अमरावती १ लाख ६७ हजार ४५५ (८ हजार १४२) 
- कोल्हापूर : १ लाख ३३ हजार ९१७ (३ हजार १६६) 
- मुंबई : ३ लाख ३१ हजार १३६ (१० हजार ८५२) 
- औरंगाबाद : १ लाख ८४ हजार ७६४ (१४ हजार ७७३) 
- नागपूर : १ लाख ६१ हजार ३८८ (९ हजार ९४४) 
- पुणे : २ लाख ५७ हजार ८ (६ हजार ८४०) 
- नाशिक : १ लाख ९७ हजार ९७६ (१२ हजार ४१९) 
एकूण अनुत्तीर्ण : ७३ हजार ९९८ 

संपादन- भूषण श्रीखंडे