खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मका खरेदी बंद 

corn
corn

भडगाव : मका खरेदीचे जेवढे उद्दिष्ट होते, ते पूर्ण झाल्याने राज्यात मार्केटिंग फेडरेशनकडून मका खरेदी बंद करण्यात आली आहे. मका खरेदीचा लक्षांक वाढवून मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आल्याचे राज्य मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. राज्यात २५ हजार टन मका खरेदीचे उद्दिष्ट होते. ऐनवेळी मका खरेदी बंद झाल्याने खासगी बाजारपेठेत मक्याचे भाव घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने मका खरेदीला परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. 
शासनाचे मका खरेदीचे अडीच लाख क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने राज्यात मका खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे निम्म्याच्यावर शेतकऱ्यांचा मका अद्यापही त्याच्याकडेच पडून आहे. शासनाने पहिल्यांदा रब्बी हंगामात ज्वारी व मका खरेदीला परवानगी दिली. केंद्राने परवानगी दिल्याने राज्य शासनाने गेल्या महिन्यात २५ हजार टन मका व १५ हजार टन ज्वारी खरेदीला परवानगी दिली. त्यानुसार राज्यात २५ हजार टन मका खरेदी झाल्याने मार्केटिंग फेडरेशनकडून मका खरेदी बंद करण्यात आली आहे. तर ज्वारी खरेदी सुरू असल्याचे मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले. जळगाव जिल्ह्यात तब्बल ८३ हजार क्विंटल मका खरेदी झाल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी परिमल साळुंखे यांनी सांगितले. 

फेडरेशनचा प्रस्ताव 
मका खरेदीचे दिलेले लक्षांक पूर्ण झाल्याने मार्केटिंग फेडरेशनने मका खरेदी बंद केली आहे. मक्याची विक्रमी नोंदणी पाहता, शासनाने मका खरेदीचा लक्षांक वाढवून द्यावा, असा प्रस्ताव चार दिवसांपूर्वी राज्य मार्केटिंग फेडरेशनकडून शासनाला देण्यात आल्याचे राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी प्रसाद ओक यांनी ‘सकाळ’ला सांगितले. शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तत्काळ मका खरेदीला परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 
 
खरेदी बंद झाल्याने शेतकरी अडचणीत 
एकीकडे कापूस उत्पादक शेतकरी कापूस खरेदी न झाल्याने अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे शासनाने मका खरेदीला सुरुवात केली. मात्र, लक्षांक पूर्ण झाल्याने ही खरेदी बंद केली. त्यामुळे राज्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांचा मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. खासगी बाजारात मका हजार ते बाराशे रुपये क्विंटलने विक्री होत आहे. तर शासकीय हमीभाव १ हजार ८६० मिळत आहे. त्यामुळे आपला माल शासकीय हमीभावात विकला जाईल, या आशेवर शेतकऱ्यांनी मका राखून ठेवला आहे. शासनाने त्वरीत परवानगी देऊन मका खरेदी पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे. 

मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने मका खरेदी बंद करण्याबाबत वरिष्ठांकडून सांगण्यात आले. पुन्हा खरेदीची परवानगी मिळाली तर मका खरेदी करू. 
- परिमल साळुंखे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी ः जळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com