या आहेत पहिल्‍या महिला कुली; उदरनिर्वाहासाठी उचलताय भार

चेतन चौधरी
Thursday, 10 September 2020

पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आज प्रत्‍येक क्षेत्रात उभ्‍या आहेत. पण जड माल उचलणे तो गाडी भरणे किंवा प्रवाशांचे सामान उचलणाऱ्या महिला कुली कधी पाहिल्‍या नसतील. पण आता हे क्षेत्रही भरून निघाले आहे. विशेष म्‍हणजे कुली असलेल्‍या वडीलांचा हा वारसा मुलीला मिळाला आणि त्‍या पहिल्‍या महिला कुली ठरल्‍या आहेत.

भुसावळ : महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. डॉक्टर, पोलिस, वकील, सैन्यदल असो की राजकारण; प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. मात्र, नाशिकच्या इंदूबाई वाघ यांची ‘कुली’ म्हणून नियुक्ती झाली असून, त्या रेल्वेच्या भुसावळ विभागातील पहिल्या महिला कुली ठरल्या आहेत. 

आजच्या स्पर्धात्मक युगात महिलाही पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. असे एकही क्षेत्र नाही जिथे महिला कार्यरत नाही. मात्र, रेल्वेस्थानकात प्रवाशांचे ओझे वाहताना आजवर पुरुष कुली आपण पाहिले आहेत. मात्र, नाशिक येथील इंदूबाई एकनाथ वाघ यांना कुलीचा बिल्ला क्रमांक ०७ मिळाला आहे. पतीच्या अकाली निधनानंतर इंदूबाई यांच्यावर आभाळ कोसळले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबाचा गाडा ओढणे कठीण झाले. माहेरची परिस्थितीही बेताचीच. 

वडीलांचा असाही वारसा पुढे
पांडुरंग कचरू मानकर नाशिक रेल्वेस्थानकात कुली होते. प्रवाशांचे ओझे वाहून मिळालेल्या कमाईतून उदरनिर्वाह करीत होते. मात्र, अतिश्रम केल्यामुळे वयोमानानुसार त्यांच्याकडून आता काम होत नव्हते. रेल्वे प्रशासनाने केलेल्या वैद्यकीय तपासणीत ते अयोग्य ठरले. रेल्वेच्या नियमानुसार वडिलांच्या जागी त्यांची विधवा कन्या इंदूबाई एकनाथ वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबत त्यांना बुधवारी (ता. ९) मध्य रेल्वेचे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या नेतृत्वात इंदूबाई यांची नाशिक रेल्वेस्थानकात प्रथम महिला कुली म्हणून नियुक्ती करण्यात आली. वाणिज्य विभागाचे अधीक्षक योगेश नागरे यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत केले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news first lady coolie appointment in bhusawal railway division