खानदेशात ग्रामपंचायतींवर बसणार प्रशासक...भाजपवर वर्चस्वासाठी महाविकास आघाडीची चाल !

राजेश सोनवणे
बुधवार, 15 जुलै 2020

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीकरिता चढाओढ असले; परंतु प्रशासक नेमणुकीचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला आहे.

जळगाव  : कोरोना संसर्गामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या असून, त्यावर प्रशासन नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या शिफारशीने या नियुक्त्या होणार असल्याने खासदार, आमदारांत वर्चस्व असलेल्या खानदेशात भाजपचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायतींवरही मर्जीतील प्रशासक नियुक्तीच्या माध्यमातून वर्चस्व करण्याची आयती संधी महाविकास आघाडीला चालून आली आहे. खानदेशातील १०३९ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती होणार आहे. 

राज्यातील १९ जिल्ह्यांतील एक हजार ५६६ ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जूनमध्‍ये, तर १२ हजार ६६८ ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० दरम्यान संपुष्टात येत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून नेमणूक करण्याबाबत अध्यादेश जारी केला आहे. सोमवारी (ता. १३) याबाबतचे ग्रामविकास विभागाने अध्यादेश काढला आहेत. 

सीईओंना अधिकार 
ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणुकीकरिता चढाओढ असले; परंतु प्रशासक नेमणुकीचा अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला आहे. यात सुरवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी चर्चा करून योग्य प्रशासकाची नेमणूक करणार आहेत. सध्या कोरोनामुळे विधिमंडळाचे अधिवेशन होऊ शकत नाही, त्यामुळे अधिनियमात दुरुस्तीदेखील करता येणे शक्य नाही. त्यामुळे राज्यपालांनी याबाबत त्यांच्या अधिकारात हा निर्णय घेतला आहे. 

 
वर्चस्वाच्या लढाईसाठीचे सूत्र 
प्रशासक नेमणूक करताना गावातील एका जबाबदार नागरिकाची प्रशासक म्हणून निवड करावी लागणार आहे. यामुळे तरुणांसाठी गावाच्या विकासात हातभार लावण्याची ही संधी चालून आहे. मात्र यात राजकारण होणार आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाची सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीवर घटक पक्षाचा प्रशासक असणार आहे. ज्या ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता असेल त्या ठिकाणी आमदार व पालकमंत्री यांच्यात विचारविनिमय होईल. पालकमंत्री पुढील नाव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवतील. 
दरम्यान, सध्या विद्यमान सरपंचांकडून आपल्या जवळच्या व्यक्तींची निवड करण्यासाठी खटाटोप सुरू झाला आहे. शिवाय पालकमंत्रीदेखील आपल्‍या मर्जीतील किंवा जवळच्‍या व्‍यक्‍तीची यात निवडीसाठी निर्णय घेतील; यामुळे भाजप शासित ग्रामपंचायतींवर ‘आपला’ माणूस प्रशासक म्हणून नियुक्त करून कुरघोडी करण्याची संधी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मिळाली आहे. 

खानदेशातील स्थिती 
जळगाव : ७८१ 
धुळे : २०९ 
नंदुरबार : ४९  

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Administrator to sit on Gram Panchayats in Khandesh, Mahavikas Aghadi's move to dominate BJP