जळगावकरांना ‘अमृत’ योजनेतील पाणी फेेब्रुवारीत मिळण्याची शक्यता 

सचिन जोशी
Monday, 25 January 2021

सुप्रीम कॉलनीत आजवर असलेल्या नळ संयोजनातून कधीही सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. अमृत योजनेंतर्गत नागरिकांना नळ संयोजनची जोडणी देण्यात येत आहे.

जळगाव : सुप्रीम कॉलनीवासीयांनी आजवर सहन केलेली पिण्याच्या पाण्याची ससेहोलपट लवकरच बंद होणार असून, पुढील महिन्यात गणेश जयंतीचा मुहूर्त साधत नागरिकांना थेट अमृत योजनेच्या नळ संयोजनद्वारे पाणी मिळण्याची शक्यता आहे. 

आवर्जून वाचा- ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यीक भालचंद्र नेमाडेंंवर जामनेरमध्ये गुन्हा दाखल 
 

या भागातील सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी महापौर भारती सोनवणे यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक वर्षभरापासून पाठपुरावा करीत असून, सोमवारी (ता. २५) त्यांनी या कामाची पाहणी केली. पाणीपुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, मनपा अधिकारी आणि मक्तेदार प्रतिनिधी उपस्थित होते. 

मुख्य जोडणी लवकरच 
अमृत योजनेच्या भूमिगत टाकीत पाणी येण्यासाठी आवश्यक असलेली मुख्य पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. महामार्गाजवळून जात असलेल्या वाघूरच्या पाइपलाइनला सुप्रीम कॉलनीची पाइपलाइन जोडणे बाकी असून, लवकरच ते काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा अभियंत्यांनी दिली. जलकुंभावर विद्युतपंप बसविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व बांधकाम आणि प्लास्टर पूर्ण झाले असून, उद्यापासून पंप बसविण्यास सुरवात होणार आहे. 

आवर्जून वाचा- लालसरी बदकाला हतनूर जलाशयाचा मानपक्षी जाहीर करावा
 

गणेश जयंतीला सुरवात 
सुप्रीम कॉलनीत आजवर असलेल्या नळ संयोजनातून कधीही सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. अमृत योजनेंतर्गत नागरिकांना नळ संयोजनची जोडणी देण्यात येत असून, सर्व काम पूर्ण झाल्यानंतर जुनी यंत्रणा बंद करून अमृतच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. सर्व काम पूर्ण करून १५ फेब्रुवारीस गणेश जयंतीचा मुहूर्त साधून श्रीगणेशा होऊ शकतो, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी महापौरांना दिली. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon amrut yojana water february month citizen