अंगणवाडी सेविकांना मिळाला मोबाईल...आता मोबाईलसाठी हे देखील मिळणार

उमेश काटे
Friday, 24 July 2020

राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका आणि तांत्रिक मनुष्यबळाला मे २०१९ मध्ये कामासाठी राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत मोबाइल पुरविले आहेत. या फोनमध्ये शासनाने तयार केलेले कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बसविले आहे.

अमळनेर  : अंगणवाडी सेविका सुमारे एक वर्षापासून केंद्राचे दैनंदिन कामकाज मोबाइलच्या माध्यमातून करीत आहेत. मात्र, मोबाइल नादुरुस्त झाल्यास दुरुस्तीचा खर्च त्यांना स्वतः करावा लागत होता. आता मोबाइल दुरुस्तीसाठी २५०० रुपयांपर्यंतची रक्कम शासनाकडून दिली जाणार आहे. हा निर्णय राज्य अभिसरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे. 

हेही पहा - मुले–सुनांना कोरोनाची लागण झाल्‍याच्या धक्‍क्‍याने मातेचा मृत्‍यू...पण तिच्यावर अंत्यसंस्‍काराला नातलगही नाही ‍

राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका, मुख्यसेविका आणि तांत्रिक मनुष्यबळाला मे २०१९ मध्ये कामासाठी राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत मोबाइल पुरविले आहेत. या फोनमध्ये शासनाने तयार केलेले कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बसविले आहे. वर्षापासून अंगणवाडी केंद्राचे या सॉफ्टवेअरमध्ये कामकाज सुरू आहे. मोबाइल फोन व बॅटरी यांच्यासाठी दोन वर्षांची वॉरंटी आहे. या कालावधीत येणाऱ्या सर्व बाबी पुरवठादारामार्फत प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त असलेल्या सर्व्हिस सेंटरमार्फत सेवा देण्यात आली आहे. परिणामी, वॉरंटीमध्ये येणाऱ्या सर्व बाबींचा मोबाइल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांना करावा लागत होता. याबाबत संघटनेचा सतत शासन तसेच आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. 

संघटनेच्‍या पाठपुराव्याला यश 
मोबाइल दुरुस्तीचा विषय राज्य अभिसरण समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला. त्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ज्या बाबी वॉरंटमध्ये येत नाहीत, अशा दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांकडून न घेता तो आयुक्तालय स्तरावर करावा आणि मोबाइल दुरुस्तीसाठी २५०० रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मागणीला यश आल्याचे संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्यासह रामकृष्ण बी. पाटील, युवराज बैसाणे, गजानन थळे, सुमंत कदम, दत्ता जगताप, सुधीर परमेश्वर, अमोल बैसाणे यांनी कळविले आहे.
 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon anganwadi sevika allow mobile repairing bill