कोरोनाच्या लक्षणांवरही ‘ॲन्टिबॅक्टेरियल ट्रीटमेंट; प्रशासनाचा वेळ अन्‌ शक्ती वाया 

कोरोनाच्या लक्षणांवरही ‘ॲन्टिबॅक्टेरियल ट्रीटमेंट; प्रशासनाचा वेळ अन्‌ शक्ती वाया 

जळगाव  : कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान असताना, कोरोनाची साधारण लक्षणे असतानाही खासगी डॉक्टरांकडून अशा संशयितांवर ‘ॲन्टिबॅक्टेरियल ट्रीटमेंट’मध्येच वेळ घालविला जात आहे. त्यामुळे चाचणीला उशीर होत असल्याने कोरोनाबाधित उशिराने रुग्णालयात दाखल होतायत. परिणामी, मृत्यूचे सत्र सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

गेल्या दोन महिन्यांत जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला. वाढत्या रुग्णांसाठी आवश्‍यक बेड, आरोग्य सुविधा पुरविण्यातच यंत्रणा व प्रशासनाचा वेळ अन्‌ शक्ती वाया जात आहे. त्यामुळे संसर्गवाढीवर नियंत्रण तर दूरच उलटपक्षी रुग्ण वाढत असून, मृत्युदरही कमी होताना दिसत नाही. 

जिल्ह्याचा मृत्युदर ४.५ टक्के 
कोरोनाबाधितांपैकी मृत्यू होणाऱ्यांचे जळगाव जिल्ह्यातील प्रमाण खूप आहे. देशात हा मृत्युदर २.१ टक्के, तर राज्यात ३.८ टक्के असताना जळगाव जिल्ह्यात मात्र ४.५ टक्क्यांपेक्षा अधिक मृत्युदर आहे. त्यामुळे प्रशासनाने मृत्युदर कमी करण्यासंबंधी ‘डेथ ऑडिट कमिटी’सह टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या दोन्ही टीमच्या सदस्यांनी कोरोनाबाधितांच्या प्रत्येक मृत्यू प्रकरणाचा अभ्यास व विश्‍लेषण केल्यानंतर काही गंभीर बाबी त्यातून समोर आल्या आहेत. 

खासगी डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार 
कोरोनात अन्य व्हायरल आजारांसारखीच सामान्य लक्षणे आहेत. सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे दिसल्याबरोबर खरेतर या रुग्णांची कोरोना चाचणी करणे तातडीने आवश्‍यक असताना खासगी डॉक्टर, जनरल प्रॅक्टिश्‍नर मात्र अशा रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात वेळ घालवत आहेत. व्हायरल इन्फेक्शनचे निदान होण्याआधीच अशा रुग्णांवर ‘ॲन्टिबॅक्टेरियल’ उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. 

रुग्ण येताहेत उशिराने 
या उपचारांमध्ये तीन-चार दिवस उलटल्यानंतरही लक्षणे कमी झाली नाहीत, तर अशा रुग्णांची चाचणी केली जाते. ती पॉझिटिव्ह आल्यास तोपर्यंत आठवडा निघून जातो व कोरोनाचे इन्फेक्शन दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यापर्यंत जाते. अशा गंभीर स्थितीत रुग्ण सरकारी रुग्णालय अथवा कोविड हॉस्पिटलला दाखल होतात. त्या वेळी मात्र धोका वाढलेला असतो. परिणामी, मृत्यू जास्त होत असल्याचे निष्पन्न समोर आले आहे. 

खासगी डॉक्टरांना इशारा 
ताप, घशात खवखव, श्‍वसनाचा त्रास, सर्दी, थंडी, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा, उलटी, अतिसार, खोकल्यातून रक्त आदी लक्षणे दिसल्यास संबंधित रुग्णावर कोरोना संशयित म्हणून आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करावेत. त्यांना तातडीने चाचणीसाठी पाठवावे व चाचणी अहवाल येईपर्यंत जनरल प्रॅक्टिश्‍नर डॉक्टरांनी त्याचा पाठपुरावा करावा. अशा प्रकारच्या सूचनांचे सर्वच खासगी डॉक्टरांनी पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

अधिकाऱ्यांना सूचना 
-खासगी डॉक्टरांनी कोरोना संशयित रुग्णांची यादी उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवावी. 
-या रुग्णांची यादी प्राप्त करून घेण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोडल अधिकारी नेमावा. 
-संशयित रुग्णांची माहिती जनरल प्रॅक्टिश्‍नरनी गुगल फॉर्मवर भरणे बंधनकारक आहे. 
-अशा रुग्णांची तातडीने कोरोना चाचणी करून घेण्याचे नियोजन पालिका मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांनी करावे. 
-कोरोनाबाधित रुग्ण ‘फॉल्स टायफॉइड पॉझिटिव्ह’ येत असल्याने जनरल प्रॅक्टिश्‍नरांची उपचाराची दिशा चुकत असून, ही बाब त्यांच्या लक्षात आणून द्यावी. 

...तर डॉक्टरांवर कारवाई 
कोरोनाबाधित रुग्ण खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत असेल व त्याचे वेळेत निदान न झाल्यामुळे अथवा तो उशिरा कोविड रुग्णालयात दाखल झाल्याने त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे ऑडिट होऊन संबंधित प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com