esakal | होय.. अयोध्येतील श्रीरामांचा जळगावमध्ये होता निवास 
sakal

बोलून बातमी शोधा

shree ram

ग्रामदैवत असलेले श्रीराम मंदिर संस्थान हे कान्हदेशातील प्रमुख संस्थानांपैकी आहे. या संस्थानास वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेली आहे. येथील भगवान श्रीरामाची सुंदर अशी उत्सवमूर्ती "श्रीराम रथ'' व रोजचे वहनावर तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणारी श्री संत मुक्ताबाई रामपालखी सोहळा मध्ये विराजमान होते. 

होय.. अयोध्येतील श्रीरामांचा जळगावमध्ये होता निवास 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : येथील ग्रामदैवत श्रीराम संस्थानमधील श्रीरामाची मुर्ती अयोध्येतील आहे. असे श्रीराम मंदिराला जुन्या दस्तऐवजावरून दिसते. यामुळे प्रभू श्रीरामचंद्र जळगावमध्ये काही दिवस राहिले होते हे स्पष्ट होते. असे मंदिराचे गादीपती मंगेश महाराज यांनी ‘सकाळ’ला सांगितले. अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. त्यापार्श्वभूमीवर श्रीरामांचा जळगावला निवास असल्याचे माहीत होणे हा योगच म्हणावा लागेल. 

जळगाव नगरीचे ग्रामदैवत असलेले श्रीराम मंदिर संस्थान हे कान्हदेशातील प्रमुख संस्थानांपैकी आहे. या संस्थानास वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेली आहे. येथील भगवान श्रीरामाची सुंदर अशी उत्सवमूर्ती "श्रीराम रथ'' व रोजचे वहनावर तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणारी श्री संत मुक्ताबाई रामपालखी सोहळा मध्ये विराजमान होते. 

अशी आहे अख्यायिका
उत्सवमूर्ती विषयी आख्यायिका आहे की, पूर्वी उत्तर भारतातील श्रीक्षेत्र अयोध्या येथील व परिसरातील साधू, संन्यासी, महंत हे नाशिक, पंचवटी येथे दर्शनास जात असत. त्यावेळेस जळगाव येथे श्रीराम मंदिर संस्थान येथे येत असत. श्रीराम रथोत्सव व श्री संत मुक्ताबाई राम पालखी प्रारंभ होण्याच्या अगोदर एकदा अयोध्या येथील रामानुज सांप्रदायातील तेजस्वी अधिकारी सत्पुरुष महंत श्री रामानंद स्वामी जळगाव येथे श्रीराम मंदिरात एक महिना मुक्कामी होते. त्यावेळेस श्री संत अप्पा महाराज युवा होते. त्यांनी त्या अधिकारी सत्पुरुषाची खूप सेवा केली. त्यांना पूजेच्या वेळी लागणारे साहित्य देणे, भोजनासाठी शिधा सामुग्री देणे, त्यांच्या बरोबर भजन, पूजन करणे अशी विविध प्रकारची सेवा त्यांनी एक महिन्याच्या काळात केली. अप्पा महाराज यांचा सेवाव्रतीपणा त्यांना आनंद झाला. त्यांना समाधान वाटले. श्रीक्षेत्र नाशिक क्षेत्री जातेवेळी अप्पा महाराजांना त्यांनी त्यांचे जवळील नित्य पूजेची ही उत्सव मूर्ती प्रसाद म्हणून भेट दिली व आर्शिवाद दिला. जोपर्यंत ही मूर्ती तुझ्याजवळ आहे. तोपर्यंत तुला आध्यात्मिक बाबतीत काही कमी पडणार नाही. त्यानंतर ही उत्सव मूर्ती श्रीराम रथोत्सव व श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात जात असते. तसेच दसरा (विजया दशमी) या दिवशी सीमोल्लंघनासाठी पालखीत विराजमान होते. त्याच काळात उत्सवमूर्तीचे भाविकांना स्पर्शदर्शन घेता येते. या चैतन्यमय सिद्ध मूर्तीचे भाविकांना मनःकामना पूर्तीचे अनुभव येतात. 

जळगावमध्ये मंदिरांवर रोषणाई
अयोध्येत उद्या (ता.५) श्रीराम मंदिर उभारणीचे भूमिपूजन होत आहे. ही ऐतिहासिक घटना असल्याने जिल्ह्यातील सर्व श्रीराम मंदिरांवर आज रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर सजविण्यात आले आहे. जुने जळगावमधील जलग्रामदैवत व भाविकांचे श्रद्धास्थान श्रीराम मंदिरात उद्या सकाळी प्रभू रामरायांचे पंचायतन उत्सवमूर्तीस नाशिक येथून गोदावरी, पंढरपूर येथून चंद्रभागा, श्री क्षेत्र मेहुण मुक्ताई येथून सूर्यकन्या तापी नदी व श्री क्षेत्र जळगाव गिरणामाई या पवित्र पंचनद्याच्या जलाने व पंचामृत अभिषेक होईल. सकाळी ११.४० ते १२.१५ वेदमंत्र पठण होईल. १२.१५ ला प्रभू रामरायांची महाआरती होईल. सायंकाळी पाचला रिपाठ व रामपाठ, श्रीरामरक्षास्तोत्र पठण होईल. सायंकाळी ६.३० ला धुपारती, ६.४५ ला ह.भ.प.श्रीधर जोशी यांचे कीर्तन होईल. असे गादीपती मंगेश महाराज यांनी सांगितले. हा कार्यक्रम सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे प्रातिनिधिक स्वरूपात होईल. भाविकांनी आपल्या घरीच राहून प्रभू श्रीरामरायांची आराधना करावी. 
नवीन बसस्थानका समोरील चिमुकले श्रीराम मंदिरातही सकाळपासून धार्मिक कार्यक्रम होतील. मात्र भावीकांना यावेळी गदीर् करता येणार नाही. 


संपादन : राजेश सोनवणे