
बसस्थानकात प्लॅटफार्मसमोर पाचोरा बस उभी असल्याने ठोंबरे भावासोबत बसमध्ये चढत होत्या. प्रवाशांची गर्दी असल्याने घाईगडबडीत दोन अल्ववयीन मुलांनी त्याच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगलसूत्र तोडले.
जळगाव : नवीन बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या विवाहितेचे दोन अल्पवयीन मुलांनी बुधवारी (ता.१८) मंगलसूत्र तोडले. हा प्रकार विवाहितेच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केल्याने ड्यूटीवरील पोलिस व होमगार्ड यांनी बच्चा गँगाचा पाठलाग केला. तासभराच्या पाठलागानंतर त्यांना पकडण्यात यश आले.
विटनेर येथील सासर व मोंढाळे (ता. पाचोरा) येथील माहेरवाशीण शुभांगी राहुल ठोंबरे (वय २५) त्यांचा भाऊ गोलू वीरभान एरंडे (२०, रा. मोंढाळे) याच्यासोबत जळगावी हरिविठ्ठलनगर येथे मामाकडे आल्या होत्या. भेटीगाठीनंतर ठोंबरे बुधवारी सकाळी पुन्हा मोंढाळेला माहेरी जाण्यासाठी निघाल्या. नवीन बसस्थानकात प्लॅटफार्मसमोर पाचोरा बस उभी असल्याने ठोंबरे भावासोबत बसमध्ये चढत होत्या. प्रवाशांची गर्दी असल्याने घाईगडबडीत दोन अल्ववयीन मुलांनी त्याच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगलसूत्र तोडले. अचानक गळ्यातील पोत तुटल्याचे समजताच शुभांगी यांनी आरडाओरड केली. तोडलेली पोत घेऊन दोघा मुलांनी बसस्थानकातून धूम ठोकली.
अन् पाठलाग झाला सुरू
आरडाओरड ऐकून बसस्थानकात ड्यूटीवरील होमगार्ड पुरुषोत्तम पाटील, सुनील शिरसाठ यांनी मंगलसूत्र तोडून पळणाऱ्या दोन्ही मुलांचा पाठलाग केला. बसस्थानकाच्या मागील तुटलेल्या भिंतीवरून ते पसार झाले. होमगार्डने तत्काळ घडलेला प्रकार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कळविला. पोलिस कर्मचारी सतीश करनकाळ यांनी बसस्थानक गाठले. पोत तोडणाऱ्यांचा शोध घेत तब्बल तासभर तिघांनी पाठलाग केल्यानंतर संशयित अल्पवयीन दोघांना ताब्यात घेण्यात यश आले. विवाहितेची पोत परत मिळाली. ताब्यातील दोघेही सिल्लोड येथील असून, दोघा संशयितांची चौकशी करून त्यांची रवानगी बालनिरीक्षणगृहात करण्यात आली.
संपादन ः राजेश सोनवणे