‘बीएचआर’ अवसायक, उद्योजकांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

 ‘बीएचआर’ अवसायक, उद्योजकांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

 जळगाव : गैरव्यवहाराच्या राज्यभरात दाखल पन्नासपेक्षा अधिक गुन्ह्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर या मल्टिस्टेट पतसंस्थेच्या मालमत्ता विक्रीतून लाभ मिळविल्याच्या संशयावरून अवसायकासह उद्योजक, ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष आदींच्या घरी, फर्मवर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापे टाकत चौकशी केली. 

आर्थिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांच्या माध्यमातून १३५ अधिकाऱ्यांच्या पथकांनी एकाचवेळी पाच- सहा ठिकाणी दिवसभर केलेल्या या तपासणीमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारीही तपासणी सुरू राहाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

फौजफाटा सकाळपासून जळगावी 
मुंबई, पुणे व पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातून आर्थिक गुन्हे शाखेच्या अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्यासह दोन उपअधीक्षक, तीन सहाय्यक अधीक्षकांसह दहा निरीक्षक, दहा उपनिरीक्षक आदी अधिकारी व कर्मचारी, असा मोठा फौजफाटा शुक्रवारी सकाळीच जळगावात दाखल झाला. स्थानिक पोलिसांनाही याबाबत कोणत्याही स्वरूपाची सूचना अथवा माहिती नव्हती. 

पाच पथके पाच ठिकाणी 
यातील अधीक्षक नवटके यांच्या नेतृत्वातील प्रमुख पथक बीएचआर पतसंस्थेचे एमआयडीसीतील मुख्य कार्यालय, उपअधीक्षकांचे दुसरे पथक पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या निवासस्थानी व अन्य तीन पथके आणखी तीन ठिकाणी एकाच वेळी धडकले आणि त्यांनी प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे, संबंधितांचे जबाब घेणे सुरू केले. 

...यांच्या घरी, फर्मवर तपासणी 
एमआयडीसीतील बीएचआर पतसंस्थेचे मुख्य कार्यालय, अवसायक जितेंद्र कंडारे यांचे शिवाजीनगर परिसरातील निवासस्थान, प्रसिद्ध व्यावसायिक सुनील झंवर यांचे खानदेश मिल संकुलातील ड्रायव्हिंग स्कूलचे कार्यालय, ठेवीदारांची संघटना जनसंग्रामचे संस्थापक व काँग्रेस पदाधिकारी विवेक ठाकरे यांचे निवासस्थान, तसेच त्यांचे गोलाणी संकुलातील कार्यालय, काही चार्टर्ड अकाउंटंटची कार्यालये आदी ठिकाणी ही चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

...या कारणासाठी तपासणी 
बीएचआर पंतसंस्थेतील कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी संचालकांसह व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत. पतसंस्थेत अडकलेल्या ठेवीदारांच्या ठेवी परताव्यासाठी संस्थेवर २०१५मध्ये अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती करण्यात आली. ठेवी परताव्यासाठी संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणून त्यांची विक्री, पतसंस्थेच्या मालमत्ता विक्री करणे गरजेचे होते. मात्र, अधिकार नसताना कंडारे यांनी अशा अनेक मालमत्ता परस्पर, नियमबाह्यपणे विकल्याचा संशय आहे. काही व्यावसायिक, उद्योजकांनी या मालमत्ता कवडीमोल खरेदी केल्या, त्यांच्यावरही संशय बळावला असून, त्यातूनच आर्थिक गुन्हे शाखा व सीआयडीने मोठी चौकशी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. 

पाच वर्षांपासून लेखापरीक्षण नाही 
बीएचआरमधील कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी संचालक, कर्मचाऱ्यांसह काही कर्जदारांवरही गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यातून ठेवी परत मिळणार नाही म्हणून त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीने सातत्याने केली होती. त्यासाठी समितीने आक्रोश मोर्चाही काढला. या मोर्चाद्वारे व आताही या समितीने अवसायक नियुक्तीपासून (२०१५) संस्थेचे लेखापरीक्षण झालेले नाही, याकडे लक्ष वेधले असून, चौकशीची मागणी केली आहे. 

कारवाईची भीती नाही : ठाकरे 
बीएचआरच्या ठेवीदारांची फसवणूक होईल, असे कोणतेही काम केलेले नाही. उलटपक्षी ठेवीदारांना तत्काळ ठेवींच्या परताव्यासाठी जनसंग्राम संघटनेच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या तपासणी, चौकशीची कोणतीही भीती नाही. ज्यांनी चुकीचे काम केले आहे, त्या दोषींवर कारवाई होईल, असे विवेक ठाकरे यांनी कळविले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com