बीएचआर.. ‘कुंपणच शेत खातंय’चा तंतोतंत प्रत्यय! 

bhr patsanshta
bhr patsanshta


बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी यापूर्वीच विविध ५४ ठिकाणी गुन्हे दाखल असताना ज्यांना ही संस्था वाचवायला दिली, त्यांनीही असहाय्य ठेवीदारांच्या ठेवी ओरबाडणे सुरू केले... ‘कुंपणच शेत खातंय’ म्हटल्यावर आता त्याचीही चौकशी सुरू झाली आहे. संस्था व संचालकांच्या मालमत्ता कवडीमोल विक्री-खरेदीच्या प्रक्रियेत संशयाची सुई राजकीय व्यक्तींपर्यंत जातेय... जिल्ह्यातच नव्हे संस्था मोठी असल्याने राज्यात पुन्हा एकदा पतसंस्थांचा मुद्दा ऐरणीवर आलाय... 

नव्वदीनंतरच्या दोन दशकांत पतसंस्थांचं विशेषत: जळगाव जिल्ह्यात चांगलंच पीक आलं... आकर्षक व्याजदराला सामान्य नोकरदार भुलले... संचालक मंडळी आपल्यातलीच आहे, असे समजत. होती-नव्हती ती जमापुंजी या संस्थांमध्ये डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली.. आणि जेव्हा पट्टी उघडली, तेव्हा या संस्थांचा बार उडाला होता... आपल्या मंडळीनं हात वर केले होते... 
भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात, बीएचआर मल्टिस्टेट पतसंस्था ही त्यापैकीच एक... अन्य संस्थांच्या तुलनेत मोठी, व्यापक. सात राज्यांमध्ये अडीचशेवर शाखा... मोठ्या बँकांच्या कार्यालयांना लाजवेल, अशी कॉर्पोरेट कार्यालयं, असा जलवा असलेल्या या संस्थेच्या तामझामावर कुणी भाळले नसते, तरच नवल! त्यातही अन्य बँका, वित्तीय संस्थांपेक्षा ठेवींवर दोन-चार टक्के अधिक व्याज देणार म्हटल्यावर जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील अनेकांनी कोट्यवधींच्या ठेवी या संस्थेत ठेवल्या. अन्य संस्थांप्रमाणेच या ठेवींना बड्यांच्या कर्जाच्या रूपाने पाय फुटले.. संचालक, अधिकाऱ्यांनी या रकमांचा गैरवापर करत प्रचंड उधळपट्टी केली... कर्जे बुडित निघाली, ठेवी असुरक्षित बनल्या.. टायटॅनिक बुडावं, तशी ही मोठी संस्था बुडाली.. 
संचालकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटकही झाली. स्वाभाविकच लाखभर ठेवीदारांच्या दह हजार कोटींच्या ठेवी असुरक्षित बनल्या... संस्थेच्या चौकशीची प्रक्रिया पार पडून अवसायकाची नियुक्ती झाली... त्यातून ठेवीदारांना न्याय मिळणे अपेक्षित होते. मात्र, ज्यांना संस्थेच्या सुरक्षेसाठी ठेवले, ठेवी परताव्यासाठी अधिकार दिले, त्यांनीच या संस्था व संचालकांच्या मालमत्ता कवडीमोल विकून स्वत:चे गल्ले आणि खरेदीदारांचेही ‘भले’ केले. ज्येष्ठ, विविध व्याधींनी ग्रस्त, तरुण मुलींच्या विवाहाचे स्वप्न उराशी बाळगत रकमा मिळण्याकडे आस लावून बसलेल्या ठेवीदारांची प्रतीक्षा संपायला तयार नाही... ठेवीदारांनी या काळात खूप यातना भोगल्या, काहींचे अनुभव अत्यंत वेदनादायी आहेत. त्यांचा तळतळाट तर लागणारच. सध्याच्या चौकशीचे सत्र हा त्यातलाच प्रकार... 
संस्था बुडण्याआधी आणि बुडाल्यानंतरही कोट्यवधींचा घोटाळा उघड झाल्यानंतर याप्रकरणाच्या चौकशीची औपचारिकता सुरू झालीय... प्रथमदर्शनी ज्यांची नावे समोर येताय, त्यांच्यामागे बडे राजकीय दिग्गज असल्याचेही सांगितले जातेय, आता चौकशी होऊन दोषी गजाआड होतीलही... पण त्यातून नाडल्या गेलेल्या सामान्य ठेवीदारांना न्याय मिळेल का? हाच खरा प्रश्‍न आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com