गावात हिंडत लांबवायचे दुचाकी...शहरात आणून द्यायचे कवडीमोल किंमतीत 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 29 June 2020

गावातून प्रत्येकी डीस्कव्हर, शाईन, प्लॅटीना, होंडा सिडी डीलक्‍स, डिस्कव्हर अशा एका मागून एक वाहने चोरुन ती, जळगाव शहरात आणून विना कागदपत्रे कवडी मोल भावात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना विक्री करण्यात आल्याचे आढळून आले आहे.

जळगाव : ग्रामीण भागातून दुचाकी चोरुन त्या शहरातील गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना कवडीमोल भावात विक्रीचा सपाटा काही चोरट्यांनी लावला होता. गुन्हेशाखेच्या पथकाने किनगावच्या चोरट्याच्या माहितीवरुन त्याच्या तीन साथीदारांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून वाहने जप्त केली आहे. 

नक्‍की पहा - कोरोनाने त्यांचा मृत्यू...परिवार क्‍वारंटाईन आणि चोरट्यांनी मारला डल्ला 

यावल तालूक्‍यातील नायगाव, आडगाव, डोणगाव आणि चुंचाळे अशा चारही गावातून प्रत्येकी डीस्कव्हर, शाईन, प्लॅटीना, होंडा सिडी डीलक्‍स, डिस्कव्हर अशा एका मागून एक वाहने चोरुन ती, जळगाव शहरात आणून विना कागदपत्रे कवडी मोल भावात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना विक्री करण्यात आल्याचे आढळून आले आहे. निरीक्षक बापु रोहम यांच्या पथकातील अशोक महाजन, संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अशरफ शेख दत्तात्रय बडगुजर, उमेश गिरी गोसावी अशांच्या पथकाने किनगाव येथून सागर सुपडू कोळी या अट्टल चोरट्याला ताब्यात घेतल्यावर गुन्ह्याचा उलगडा झाला. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने यावल तालूक्‍यातूनच चार दुचाकी लंपास करुन त्या विक्री केल्याचे कबुल केले. 

चोरीची वाहने शहरात विक्री 
यावल तालूक्‍यातून लंपास केलेली वाहने सागर कोळी याने त्याचा साथीदार आकाश ऊर्फ धडकन सुरेश सपकाळे (वय-22,रा. रथचौक जळगाव) याच्या मदतीने सुदर्शन शांताराम मोरे(वय-24मेहरुण),दिपक बाबुलाल खांदे(वय-26,रा.साईपार्क) यांना विक्री केल्याचे आढळून आले असुन गुन्हेशाखेने चारही वाहने जप्त केली आहे. 

दारुच्या पार्ट्यांनी गुन्हा उघड 
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या सुचने नुसार गुन्हेशाखेचे पथक वाहन चोरट्यांचाशोध घेत होते. ऐरवी शहरातून वाहने चोरुन ती, मध्यप्रदेश आणि ग्रामीण भागात विक्री होत होती. मात्र तालूक्‍यातून चोरलेली वाहने शहरात आणुन विक्रीचा नवीन प्रकार सागर कोळी मुळे उघडकीस आला. गेल्या तीन-चार महिन्या पासुन कामधंदे लॉकडाऊन मुळे बंद आहे. अशातही सागर त्याच्या मित्रा सोबत दारुच्या पार्ट्या करीत होता, पैसा उडवत असल्याची गुप्त माहिती गुन्हेशाखेला मिळाल्यावरुन त्याला ताब्यात घेतल्यावर वाहन चोरीचा प्रकार उघडकीस आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon bike chori village and sale city