आडवाणींच्या रथयात्रेचे स्वागत कोणी केले; पुरावे देण्यावरून भाजप-शिवसेनेत उडाला राजकीय धुराळा !

आडवाणींच्या रथयात्रेचे स्वागत कोणी केले; पुरावे देण्यावरून भाजप-शिवसेनेत उडाला राजकीय धुराळा !

जळगाव : अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त कारसेवा आणि लालकृष्ण अडवानी यांच्या रथयात्रेच्या आठवणींना उजाळा मिळाला; परंतु या रथयात्रेवरून जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत पुराव्यांचा राजकीय धुरळा उडाला आहे. त्यात आता थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीवरून त्यांच्या सहभागाच्या पुराव्याबाबत शिवसेनेचे कार्यकर्ते प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. 

श्रीराम जन्मभूमी मंदिर भूमिपूजनानिमित्त जिल्ह्यात अनेकांनी आठवणी सांगितल्या. त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे लालकृष्ण अडवानी यांच्या रथयात्रेचे स्वागत केले. आपलाही या रथयात्रेत सहभाग असल्याचे सांगितले. त्यावर भाजपचे माजी नगरसेवक उदय भालेराव यांनी प्रश्‍न उपस्थित करत लालकृष्ण अडवानी यांची श्रीराम रथयात्रा जळगावात आलीच नव्हती, असा दावा करत अडवानी जेव्हा जेव्हा जळगाव जिल्ह्यात आले व पाळधी येथे रथयात्रेत आलेच नव्हते, अशी माहितीही सोशल मीडियावर अपलोड केली टाकली व पालकमंत्री गुलाबराव पाटील ‘ठोकून देतात’ असेही म्हटले आहे. 

शिवसैनिक संतप्त 
शिवसेनेचे जळगावातील नगरसेवक प्रशांत नाईक यांनी थेट पाळधी येथे लालकृष्ण अडवानी यांची रथयात्रा आल्याचे फोटोसह पुरावेच दिले. तसेच पाळधी येथील भाजप कार्यकर्ते सुनील झंवर यांची या यात्रेसाठी गुलाबराव पाटील यांना मदत झाल्याची व्हिडिओ क्लिपही प्रसिद्ध केली. मात्र आता या रथयात्रेवरूनही चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध झालेल्या फोटोत अडवानी यांच्या रथयात्रेवर ‘सुराज्य रथयात्रा’ असे नाव आहे. यात्रेत वेंकय्या नायडू, भाजपचे नेते एकनाथ खडसे, माजी आमदार बी. एस. पाटील दिसत आहेत. 

फडकेंकडून वस्तुस्थिती स्पष्ट 
याबाबत माहिती घेतली असता भाजपचे नेते व ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चे संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी सांगितले, की ही रथयात्रा श्रीराम रथयात्रा नव्हे तर अडवानी यांनी नंतर काढलेली ‘सुराज्य रथयात्रा’ असल्याचे स्पष्ट केले. 

खडसेंचा सहभाग मात्र फडणवीस कुठे? 
रथयात्रेच्या पुराव्याचा धुरळा एवढ्यावरच थांबला नाही, तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट खडसे आणि फडणिसांच्या सहभागाच्या पुराव्यापर्यंत वाद सुरू केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कारसेवेच्या सहभागाच्या मुलाखतीत माझ्या कानाजवळून गोळी गेली असे एका आठवणीच्या मुलाखतीत सांगितले. त्यावरूनही वादळ उठले आहे. सोशल मीडियावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे, की या आंदोलनात सहभाग असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा एकही पुरावा आढळून आलेला नाही. मात्र सत्तेचा लाभ घेण्यात ते सर्वांत पुढे... भाजपने ज्या नथाभाऊंना डावलले. त्यांचे कारसेवेत अनेक फोटो पाहावयास मिळतात. याला म्हणतात... वशिला..! भाजप- सेनेचा हा वाद सोशल मीडियावर चांगलाच रंगतोय. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com