
शेवटचा हंगाम आहे. बोंडअळीवर उपाय करायला गेले तर खर्च अधिक अन उत्पन्न कमी. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीचे पिकच उपटून टाकणे पसंत केले आहे.
जळगाव ः जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने यंदा पुन्हा डोळे वर काढले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. पावसाळयातील अतीवृष्टीने कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता गुलाबी बोंडअळी कपाशीवर आल्याने शेतकऱ्यांना कपाशी उपटून फेकण्याशिवाय पयार्य उरलेला नाही. शासनाने बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी होत आहे.
आवश्य वाचा- भातशेतीसाठी ‘एसआरटी’ तंत्रज्ञानाचा आदिवासी भागात वापर !
जिल्ह्यात यंदा पाऊस चांगला असल्याने साडेपाच लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला होता. त्यात एक लाख हेक्टरवरील पेरा अतिवृष्टीने वाया गेला. बागायती कपाशी चांगल्या प्रकारे हातात आली.नंतर मात्र पुन्हा पावसाने कपाशीचे नुकसान केले. कोरडवाहू कपाशीचा दोन वेळा हंगाम हातात आला. आता मात्र बोंडात अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात बोंडअळी कपाशीवर आहे. एकत्रित दोन लाख हेक्टरवरील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. आता शेवटचा हंगाम आहे. बोंडअळीवर उपाय करायला गेले तर खर्च अधिक अन उत्पन्न कमी. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीचे पिकच उपटून टाकणे पसंत केले आहे. डिसेंबर महिन्यात शेवटचा हंगाम कपाशीचा असतो. फरदडला जास्त भावही मिळत नाही. यामुळे बोंडअळीवर उपाय करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसत नाही.
हरभरा पेरणी अधिक
कपाशी काढून त्याठिकाणी हरभरा पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. थंडीचा सिझन आहे. हवेतील आद्रतेमुळे व एक वेळ पाण्यावर हरभरा, ज्वारी, बाजरी अशी पिके येतात. पाणी कमी लागेल व उत्पन्नही चांगले येईल या आशेने कपाशीकाढून हरभरा, ज्वारी, बाजरी अशी पिके घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.
वाचा- निलगिरी झाडांची लागवड फायदेशीर, मिळणार लाखोचे उत्पन्न ! -
आकडे बोलतात…
- कपाशीचा पेरा--५ लाख ५० हजार हेक्टर
- अतिवृष्टीने नुकसान--१ ते १५ लाख हेक्टर
- बोंडअळीचा प्रादुर्भाव--२ लाख हेक्टर
कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक ठिकाण कपाशी प्रभावित आहे. शेतकऱ्यांनी फेरोमन सापळे लावावे. बोंडअळीचया नायनाटासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानूसार किटकनाशक फवारणी करावी.
संभाजी ठाकूर,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
संपादन- भूषण श्रीखंडे