बेसमेंटचा अनधिकृत वापर; मग होते वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

शहरातील व्यापारी संकुलांच्या बेसमेंटमधील पार्किंगची जागा काही व्यावसायिकांनी गिळंकृत केल्याने वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच झाली आहे. नगररचना विभागाने अशा ३७ बांधकामांना अनधिकृत ठरवले आहे.

जळगाव : शहरात अनेक ठिकाणी व्यापारी संकुलाची जागा वाहनतळासाठी असताना व्यापाऱ्यांनी ही जागा बळकावली असून, तेथे दुकाने सुरू करण्यात आल्याने ग्राहक थेट रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत. यामुळे शहरात अधिकच वाहतूक कोंडी होत आहे. राजकीय हस्तक्षेपाने बेसमेंटचा वापर व्यापारासाठी केला जात असल्याने पोलिसांची भूमिका दुर्लक्षपणाची असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 
‘सकाळ’ने व्यापारी संकुलाचे बसेमेंट पार्किंगसाठी खुले करावे, अशी मागणी वारंवार लावून धरली. मात्र महापालिकेतील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. 

न्यायालयात धाव 
शहरातील व्यापारी संकुलांच्या बेसमेंटमधील पार्किंगची जागा काही व्यावसायिकांनी गिळंकृत केल्याने वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच झाली आहे. नगररचना विभागाने अशा ३७ बांधकामांना अनधिकृत ठरवले आहे. १३३ बांधकामांची सुनावणी पूर्ण केली आहे. परंतु समस्येचे निराकरण करण्याऐवजी कारवाईकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करत वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी आयुक्तांना थेट सात दिवसांची मुदत देत न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. शहराची लोकसंख्या जशी वाढत आहे, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रस्ते तेवढेच असून, जागा कमी पडायला सुरवात झाली आहे. प्रमुख बाजारपेठ व दुकानांसमोर वाहनांची गर्दी होत आहे. पार्किंगसाठी असलेल्या जागा व्यावसायिकांनी घशात घातल्या. बेसमेंटमधील पार्किंगच्या जागेत दुकाने बांधून त्याची विक्री करत फसवणूक केल्याचा आरोप अनेकदा झाला. 

मनपाचेच दुर्लक्ष
शहरातील नाथ प्लाझा, गोलाणी मार्केट, पटेल प्लाझा, छत्रपती शाहू महाराज रुग्णालयासमोरील मार्केट, जिल्हा न्यायालयासमोरील मार्केट आदी ठिकाणी ग्राहकांना वाहने उभी करण्यास जागा नाही. पार्किंगची जागा बळकावत तेथे दुकाने थाटणयात आली. ‘सकाळ’ने वारंवार पाठपुरावा करीत पार्किंगसाठी बेसमेंट मोकळी करण्याची मागणी महापालिकेकडे केली. मात्र महापालिकेच्या सर्वच अधिकाऱ्यांनी याकडे दुलर्क्ष केले. 

व्यापारी संकुलाच्या बेसमेंटचा अनधिकृत वापर होत असल्याने पार्किंगला जागा मिळत नसल्याची खरी समस्या आहे. त्यामुळे पालिकेने ३७ बांधकामे सील करून ती निष्कासित करावी तसेच पार्किंगची व्यवस्था करावी. ९६ प्रकरणांत तत्काळ निर्णय द्यावा, १३३ प्रकरणांत अनधिकृत बांधकामाचा शोध घेऊन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. 
– दीपक गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city complex no parking aragment and road traffic