curfew
curfew

जळगावात 'जनता कर्फ्यू'चा फज्जा; शॉपिंग कॉम्प्लेक्स बंदच 

जळगाव : महापालिकेने मंगळवारी (ता. २१) प्रभाग चार ते सहामध्ये पाळलेल्या जनता कर्फ्यूचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये कडकडीत पाळला गेला. मात्र, नागरिक मार्केट बंद असताना लहान-मोठी वाहने घेऊन गावात बिनदिक्कतपणे ये-जा करीत होते. 
महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार कोरोना संसर्गाचा फैलाव होऊ नये, यासाठी जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्याची अंमलबजावणी सोमवार (ता. २०)पासून सुरू झाली. मंगळवारी जनता कर्फ्यू असलेल्या प्रभागात बहुतांश मार्केट येतात. यामुळे मुख्य बाजारपेठेसह सर्वच भागात जनता कर्फ्यूमुळे शांतता होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. ज्या ठिकाणी पत्रे लावले होते त्याच ठिकाणी पोलिस होते. इतरत्र पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना न हटकल्याने जनता कर्फ्यूचा काहीही परिणाम झाला नाही. यात नागरिक घरात बसणे व रस्त्यावर शुकशुकाट असणे आवश्यक आहे. केवळ डॉक्टरांकडे किंवा औषधी घेण्यासाठीच बाहेर पडणे आवश्यक आहे. मात्र, नागरिक त्याची अंमलबजावणी करताना दिसून येत नाही. मार्केट बंद असले म्हणून काय झाले. इतर काय सुरू आहे, हे पाहण्यासाठी अनेक जण दुचाकी, चारचाकीने शहरात आल्याचे चित्र होते. 
 
मार्केटमध्ये शुकशुकाट 
तब्बल चार महिन्यांनंतर शहरातील सर्वच व्यापारी संकुले सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. सेंट्रल फुले मार्केटमध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ते नसल्याने नागरिक दुकानात आलेच नाहीत. या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना ऑनलाइन विक्री करण्यास सांगितले आहे. मात्र, व्यापाऱ्यांच्या सांगण्यानुसार ग्राहक स्वतः मालाची पाहणी करूनच माल घेतात. यामुळे आम्हाला काउंटर सेलला परवानगी द्यावी, यासाठी सोमवारी सेंट्रल फुले मार्केटमधील दुकाने बंदच होती. मंगळवारी जनता कर्फ्यू असल्याने गोलाणी मार्केट, गांधी मार्केट, फुले मार्केट, गोधडीवाला मार्केट आदी मार्केटमध्ये शुकशुकाट होता. बुधवारी (ता. २२) प्रभाग सात ते दहामध्ये जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com