शहरात मार्केटमध्ये चार दिवस खरेदी...कोणत्‍या दिवशी राहणार मार्केट सुरू पहा

jalgaon city market
jalgaon city market

जळगाव : शहरातील चार मोठ्या कॉम्पलेक्स आठवड्यातील चार दिवस सुरू तर तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. कॉम्पलेक्समधील व्यापारी, महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आलेल्‍या निर्णयानूसार रविवार, सोमवार, बुधवार व शुक्रवार असे चार दिवस गोलाणी मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट, बी.जे.मार्केट सुरू राहतील. तर मंगळवार, गुरूवार, शनिवारी बंद राहणार आहे. येत्या ५ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. 
महापालिकेत सायंकाळी सहाला सुरू झालेल्या बैठकीस आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राउत, आयुक्त सतीष कुलकर्णी, सेंट्रल फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मतानी, गोलाणी मार्केट व इतर मार्केटचे पदाधिकारी उपस्थित होते.

सम- विषम तारखांवर व्यापाऱ्यांचा आक्षेप
आयुक्त कुलकर्णी यांनी शासनाच्या व्यापारी संकुले सुरू करण्याबाबत नियमांची माहिती दिली. त्यानूसार सम व विषम तारखांना व्यापारी संकुलातील दुकाने सुरू ठेवता येतील, असे सांगितले. त्यावर व्यापाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला. सम- विषम तारखांना दुकाने सुर ठेवताना अडचणी येतील. सर्वच दुकाने खुले नसल्याने ग्राहकांना एकाचवेळी सर्व वस्तूंची खरेदी करता येणार नाही; यासह विविध कारणे सांगण्यात आली. त्यावर आमदार भोळे यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त व्यापाऱ्यांचा हिताचा निर्णय घेत आहे. यामुळे गर्दी कमी होवून कोरोनाचा संसर्ग लागण्याची शक्यता कमी असेल असे सांगितले. व्यापाऱ्यांना कोरोना लागण न होण्याासाठी हा निर्णय असल्याचे सांगण्यात आले. मात्र व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ कमी करा मात्र सर्व दुकाने सुरू करू द्या अशी आग्रही मागणी केली. 

बुधवारपासून अंमबजावणी
यावेळी जिल्हाधिकारी राउत, आमदार भोळे, आयुक्त कुलकर्णी यांनी एकत्रीतपणे अंतीम निर्णय घेतला की, आठवड्यातील चार दिवस दुकाने सुरू तर तीन दिवस दुकाने बंद ठेवायची. याला सर्व व्यापाऱ्यांनी मान्यता दिली. येत्या ५ ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. 

बैठकीतील ठळक मुद्दे..... 
- गर्दी नियंत्रण व्यापाऱ्यांनीही करायचे आहे 
- मास्कचा व्यापार बंधनकारक अन्यथा दंड 
- मास्क घालून न येणाऱ्यांना माल देवू नका 
- सॅनिटाझर, मास्कचा वापर अनिवार्य 
- दुकानात ग्राहक म्हणून फक्त ५ जणांना परवानगी 
- नियम पाळले नाही तर दंड 
- ग्राहकांची तापमान तपासणी करा 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com