esakal | घटस्थापनेचा मुहूर्त;पुन्हा एकदा भरू लागणार भक्तांचा मेळा
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Chimukle Ram Temple

घटस्थापनेचा मुहूर्त;पुन्हा एकदा भरू लागणार भक्तांचा मेळा

sakal_logo
By
सचिन जोशी


जळगाव: राज्य शासनाच्या (State government) दिशानिर्देशानुसार घटस्थापनेपासून (Navratri festival) सर्व मंदिरे (Temple), प्रार्थनास्थळे (Religious place) सुरू होत आहेत. त्यादृष्टीने जळगाव जिल्ह्यातील देवालयेही भक्तांसाठी खुली होत असून, गुरुवार (ता. ७) पासून मंदिरांमध्ये भक्तांचा मेळा पुन्हा एकदा भरू लागणार आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्हा रुग्णालय:रुग्णसेवेच्या नावाखाली दलालांचा सुळसुळाट


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षात नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशी केवळ तीन-साडेतीन महिनेच मंदिरे सुरू होती. फेब्रुवारीच्या पंधरवड्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा संपूर्ण लॉकडाउन लागले. आता तब्बल आठ महिन्यांनी गुरुवारपासून घटस्थापनेच्या पवित्र मुहूर्तावर मंदिरे सुरू होत आहेत. त्यादृष्टीने भाविकांची गर्दी होऊ नये, कोरोनासंबंधी नियम पाळले जावेत म्हणून मंदिरांनी नियोजन केले आहे.


श्रीराम मंदिर संस्थान
ग्रामदैवत असलेल्या जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर संस्थान मंदिरात मास्कशिवाव भाविकांना प्रवेश नाही, सॅनिटायझरचा वापर आवश्‍यक, दर्शनाला गर्दी न करता योग्य अंतर ठेवून मंदिरात प्रवेश, अशा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे विश्‍वस्त तथा गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांनी सांगितले.


चिमुकले श्रीराम मंदिर
नव्या बसस्थानकासमोरील चिमुकल्या श्रीराम मंदिरात कोरोनासंबंधी नियमांचे योग्य प्रकारे पालन करूनच भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचे फेसबुकवर लाइव्ह प्रक्षेपण करण्याचे नियोजन आहे, असे द्वारकाधीश जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील ५ लाख बालकांना लवकरच मिळणार कोराना लस..

ओंकारेश्‍वर मंदिर
जयनगर परिसरातील प्रसिद्ध ओंकारेश्‍वर मंदिरातही कोरोनासंबंधी नियम, दिशानिर्देशांचे पालन करत घटस्थापनेपासून सर्व भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येत आहेत. तसेही आता नागरिकांना मास्क वापरण्याची सवय लागली आहे, भक्तगण मंदिरात बाहेरून दर्शनाला येत असले तरी ते मास्क लावूनच येतात. त्यामुळे योग्य नियम भक्त पाळतीलच, असा विश्‍वास विश्‍वस्त दीपक जोशी यांनी व्यक्त केला.


भवानी मंदिरात प्रवेश नाहीच
सुभाष चौकातील भवानीमाता मंदिर (श्री महालक्ष्मी) गुरुवारपासून भक्तांच्या दर्शनासाठी खुले होईल. नवरात्रोत्सव सुरू होत असल्याने या मंदिरात विशेषत: महिलांची मोठी गर्दी होते. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणे शक्य नाही. त्यामुळे मंदिर जरी उघडणार असले तरी मंदिरात कुणालाही प्रवेश नसेल. मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच भक्तांना दर्शन घेता येणार आहे. मंदिरात प्रसाद व पुष्पमाला, पूजासाहित्य, ओटीचे साहित्य नेण्यास मनाई आहे. नवरात्रोत्सवात ओटी भरण्याला विशेष महत्त्व असते, महिलांची त्यावर मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे मनाई केली तरी महिला ऐकणार नाहीत. एकूणच, मंदिर खुले ठेवले तर या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल. म्हणून मंदिराचे बाहेरूनच दर्शन घेता येणार असल्याचे विश्‍वस्त तथा पुरोहित महेश त्रिपाठी यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

loading image
go to top