जिल्हा रुग्णालय होणार पुन्हा ‘नॉन कोविड’

देवीदास वाणी
Saturday, 12 December 2020

जिल्हा कोविड रुग्णालय नॉन कोविड करण्याबाबत प्रक्रिया सूरू झाली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दाखल करण्यात येईल. जिल्हाधिकारी त्याबाबत निर्णय घेतील. लवकरच त्याबाबत निर्णय हेाईल. 
डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा शल्य चिकीत्सक 

जळगाव : येथील जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जिल्हा कोविड रुग्णालय) नॉन कोविड करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा रुग्णालय नॉन कोविड करताना त्यात पुर्वीसारखे वॉर्ड ठेवायचे की कसे ? कोविड रुग्णांसाठी वेगळा वॉर्ड करायचा त्यासाठी स्टाफ, नर्सिंग स्टाफ कसा ठेवायचा याबाबत आरोग्य यंत्रणेमध्ये खलबते सुरू आहे. येत्या सोमवारपर्यंत जिल्हा रुग्णालय नॉन कोविड करण्याची शक्यता असल्याची वैद्यकीय सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले. 
जिल्हा रुग्णालय सध्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व शिरसोली रोडवरील देवकर हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले आहे. याठिकाणी जिल्हा रुग्णालयातील (सिव्हील) सुविधा रुग्णांना दिल्या जातात. कोविड संसर्गाची लागण झाल्यापासून जिल्हा रुग्णालयात इतर उपचार केले जात नाही. जिल्हा रुग्णालय स्वतंत्र कोविड रुग्णालय करण्यात आले होते. त्यासाठी कोट्यावधी रूपयांची आरोग्य यंत्रणा जिल्हा रुग्णालयात उभारली गेली. व्हेंटेलेटर, आयसीयू वॉर्ड, ऑक्सीजन पाईप लाईन, आता स्वतंत्र ऑक्सीजन टँकही उभारला जात आहे. कधी नव्हे ती अत्याधुनिक यंत्रणा जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आली आहे. 

महिनाभरापासून संख्या कमी
सध्या कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे तालुका स्तरावरील कोविड केअर सेंटर, हॉस्पीटल बंद करण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयातही शंभराच्यावर कोरोनाबाधित नाहीत. अशी स्थिती महिनाभरापासून सूरू आहे. यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राउत, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या याबाबत दोन तीन वेळा बैठका झाल्या. त्यात लवकरच जिल्हा कोविड रुग्णालय करण्याबाबत निर्णय झाला आहे. 

पूर्वीच्या सुविधा मिळणार 
जिल्हा रुग्णालयात पूर्वीप्रमाणे अपघात विभाग, इर्मजन्सी वॉर्ड, लहान मुलांचा वॉर्ड, डिलेव्हरी कक्ष, ऑपरेशन थिएटर, हृदयविकार असलेलया रुग्णांसाठी आय.सी.यू. वार्ड, जळीत कक्ष आदी वॉर्ड असतील. पूर्वीप्रमाणे येथे रुग्णांवर उपचार केले जातील. जिल्हा रुग्णालयातच १५० खाटांचे कोविड रुग्णालय स्वतंत्रपणे राहील. या वार्डाचा व जिलहा रुग्णालयातील वार्डाचा संबंध असणार नाही. 
 
 
जिल्हा कोविड रुग्णालय नॉन कोविड होणार आहे. हे निश्‍चीत आहे. त्याबाबत जिल्हा रुग्णालयात कोणत्या ठिकाणी कोणती सुविधा द्यावयाची, ओपीडी कोठे ठेवायची, विविध वॉर्ड रुपरेषा तयार करण्याचे काम सूरू आहे. त्याबाबत आरखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल. 
डॉ. जयप्रकाश रामानंद, ‘डीन’ जिल्हा कोविड रुग्णालय 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon civil hospital about non covid hospital