strike
strike

चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार; कारवाई मागे घेण्यासाठी कनिष्ठ डॉक्‍टर

जळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयातील शौचालयात "कोरोना'ग्रस्त वृद्धेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर या प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांसह दोन सहकारी डॉक्‍टरांना निलंबित केले असून, ही कारवाई अन्यायकारक आहे, ती तातडीने मागे घ्यावी, या मागणीसाठी आज महाविद्यालयातील निवासी डॉक्‍टर्स व "आयएमए'च्या डॉक्‍टरांनी आक्रमक पवित्रा घेतला. या दोन्ही संघटनांतर्फे पोलिस अधीक्षकांसह पालकमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले. 
बुधवारी (10 जून) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- सामान्य रुग्णालयाच्या कोविड कक्षातील शौचालयात आठवडाभरापासून बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आढळून आला. हे प्रकरण राज्यातच नव्हे; तर देशभरात गाजले. या प्रकरणी आरोग्य संचालकांनी तातडीने महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. सुयोग चौधरी, डॉ. कल्पना धनकवार यांना निलंबित केले. आणखीही काही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार कायम आहे. तर सोबतच या प्रकरणी पोलिसांतही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

निवासी डॉक्‍टरांचा विरोध 
या प्रकरणी महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ निवासी डॉक्‍टरांनी पोलिस अधीक्षकांना आज निवेदन दिले. जळगाव कोविड सेंटर गेल्या दोन महिन्यांपासून अविरत सेवा देत आहोत. अनेक पदे रिक्त असताना तोकड्या मनुष्यबळात रुग्णांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. "कोरोना'शी लढताना ड्युटीवरील दोन डॉक्‍टरही "पॉझिटिव्ह' आले. अशा स्थितीत 10 जूनला घडलेल्या घटनेला केवळ डॉक्‍टरांचा दोष समजून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे योग्य नाही. बाधित महिला ज्या दिवशी (2 जून) गायब झाली होती, त्याच दिवशी ड्युटीवरील वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना कळविले होते. पोलिस दप्तरी त्याची नोंदही करण्यात आली आहे. तसेच, संबंधित कक्षातील नर्सलाही महिलेचा तपास घेण्याच्या सूचना डॉक्‍टरांनी दिल्या होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात डॉ. चौधरी व डॉ. कल्पना यांचा प्रथमदर्शनी कोणताही दोष असल्याचे दिसत नाही. परिणामी, त्यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी कनिष्ठ निवासी डॉक्‍टरांनी केली आहे. 
निवेदनावर डॉ. जितेंद्र कोळी, आकाश कोकरे, प्रदीप पौंड, कोमल तुपसागर, शीतल टाक, प्रसाद खैरनार, सुप्रिया सोनवणे, चंदन महाजन यांच्यासह अन्य डॉक्‍टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

डॉक्‍टरांवरील कारवाई मागे घेण्याची "आयएमए'ची मागणी 
जळगाव : वृद्धेच्या मृत्यू प्रकरणात डॉक्‍टरांना विनाकारण गोवण्यात आल्याचा दावा करत आयएमए संघटनाही या वादात आक्रमक झाली असून अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह दोघा डॉक्‍टरांवरील कारवाई तसेच गुन्हाही मागे घेण्यात यावा, अशी मागणी "आयएमए'ने केली आहे. 
"आयएमए'च्या पदाधिकाऱ्यांनी आज यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले. "कोरोना'च्या संकटकाळात वैद्यकीय महाविद्यालयात दोन महिन्यांपासून डॉ. खैरे यांच्यासह डॉ. सुयोग चौधरी व कल्पना धनकवार अविरत सेवा देत आहेत. मात्र, वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी त्यांचा दोष नसताना डॉ. कल्पना व डॉ. चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तो अन्यायकारक आहे. तसेच डॉ. खैरेंसह दोघांना निलंबित करण्यात आल्याची कारवाई चौकशी न करता एकतर्फी करण्यात आली आहे. वृद्ध महिला बेपत्ता झाली तेव्हाच ड्यूटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवून जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे या तिघा डॉक्‍टरांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी आयएमएने केली आहे. निवेदन देताना डॉ. धर्मेंद्र पाटील, गणेश भारुळे, जितेंद्र कोळी, स्वप्नील चौधरी, सुधीर चौधरी, सुयोग चौधरी यांच्यासह अन्य डॉक्‍टर्स उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com