झाडे झुडपे- माती ट्रॅक्टरमध्ये भरा आणि पैसे कमवा, कुठे सुरू आहे असा प्रकार; वाचा सविस्तर !

भूषण श्रीखंडे
Saturday, 12 September 2020

कचरा संकलनाच्या नावाखाली झाडे, झुडपे, दगड गोटे, माती मिश्रित कचरा हा गाड्यामध्ये भरून वजन काट्यावर वजन करून चिक्कार पैसा कमविला जात आहे.

जळगावः जळगाव शहरात दैनंदिन स्वच्छता व कचरा संकलनाचा मक्ता नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला एक वर्षापूर्वी दिला होता. परंतू सहा महिन्यात नागरिकांच्या तक्रारी तसेच मक्तेदाराने काम बंद केले होते. त्यानंतर महापालिकेने पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या मक्तेदार व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून सफाईचे काम करण्यात आले. मात्र दिड-दोन महिन्यापूर्वी वॉटरग्रेस कंपनीला मक्ता देण्यात आला. शहरात स्वच्छतेचे काम देखील चांगले सुरू असतांना पुन्हा आता मक्तेदार कडून मागचा पाढा सुरू केला असून कचरा संकलनाच्या वाहनांमध्ये कचरा उचलण्या ऐवजी झाडांच्या फांद्या, माती मिश्रित कचरा भरलेले वाहने राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आज हा प्रकार उघड केला.

जळगाव महापालिकेने पुन्हा वॉटर ग्रेस कंपनीला पुन्हा सफाईचा ठेका दिल्याने शहरातील नागरिकांसह महापालिकेतील विरोधीपक्षातील लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रश्‍न चिन्ह उपस्थित केला होता. त्यात सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना पुन्हा मक्ता सुरू करण्यासाठी पाकिटे देण्यात असल्याचे आरोप देखील करण्यात आले. त्यात आज  सकाळी राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी कालंकी माता चौकात तोल काट्यावरील वाहनांची तपासणी केली असता त्यांना काचऱ्यांऐवजी तोडलेली झुडपे भरलेली आढळून आली. त्यांनी साहाय्यक उपायुक्त पवन पाटील यांना याबाबत माहिती दिली. उपायुक्त पाटील देखील तोल काट्यावर आले. यावेळी अभिषेक पाटील यांनी वाहने दाखविलीत कचरा संकलनात मक्तेदार मोठा गैरव्यवहार होत असल्याचे सांगितले. यावर उपायुक्तांनी संपूर्ण चौकशी करून मक्तदेाराला दोषी असल्यास दंड आकारला जाणार असल्याचे सांगितले.

मनपाची होतेय आर्थिक लूट
सफाई मक्तेदाराकडून शहरात कचरा संकलनाच्या नावाखाली झाडे, झुडपे, दगड गोटे, माती मिश्रित कचरा हा गाड्यामध्ये भरून वजन काट्यावर वजन करून चिक्कार पैसा कमविला जात आहे. यात मात्र महापालिकेची लूट होत असून कचरा मात्र रस्त्यावर पडून असल्याचे आरोप यावेळी अभिषेक पाटील यांनी केले.

वाहनांवर जीपीएस यंत्रणा नाही
सफाईच्या मक्त्याच्या करारातील नियम व अटी शर्तीनुसार वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविणे आणिवार्य आहे. परंतु मक्तेदाराच्या एका ही वाहनावर ही यंत्रणा बसलेली नसून मक्ता पुन्हा सुरू करतांना काही गोष्टीसाठी वेळ महापालिकेकडे मागितली होती. परंतू आता महापालिका जीपीएस यंत्रणा सर्व वाहनांवर लवकरात लवकर मक्तेदाराने बसवावी अशी लवकरच नोटीस मक्तेदाराला देणार आहे. 

सफाईच्या मक्ताच्या अटी शर्ती नुसार आज काही वाहनांमध्ये कचरा न आढळता झाडे झुडपे, माती मिश्रीत कचरा आढळून आला आहे. त्याचे वजन नाही. याबाबत मक्तेदाराला नोटीस देऊन त्याच्यावर दंड देखील आकारली जाणार आहे. 
- पवन पाटील, साहाय्यक उपायुक्त, जळगाव महापालिका.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon collecting garbage from the daily cleaning monopoly in Jalgaon city, soil and trees are filled in the cart.